दीर्घ आणि दुर्धर आजारपणातील तीव्र त्रास अत्यंत सहनशीलतेने सोसणारी अन् सतत इतरांचा विचार करणारी वापी (गुजरात) येथील कै. (कु.) अंकिता राजेंद्र वाघ (वय २१ वर्षे) !

‘कै. (कु.) अंकिता राजेंद्र वाघ हिने लहान वयातच किती जीवघेणे आयुष्य भोगले’, हे या लेखावरून लक्षात येईल. ‘तिने भोगलेले असह्य त्रास तिच्या कुटुंबियांनीही कसे सहन केले असतील’, याची कल्पनाही करता येत नाही. या दोन लेखांतून ‘जीवघेणे आयुष्य कसे भोगावे लागते’, हे वाचकांनी शिकून घ्यावे. तिसर्‍या महायुद्धाच्या काळात याचा उपयोग होईल !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (४.११.२०२२)

श्री. राजेंद्र वाघ, त्यांच्या पत्नी सौ. रत्ना वाघ आणि त्यांची मुले अनुक्रमे सौ. ललिता विठ्ठल कदम, श्री. शुभम् वाघ अन् दिवंगत कु. अंकिता वाघ हे वापी (गुजरात) येथील साधक आहेत. मोठी मुलगी सौ. ललिता कदम आणि तिचे यजमान श्री. विठ्ठल कदम हे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. कु. अंकिता (वय २१ वर्षे) आई-वडिलांसह वापी येथे रहात होती.

वर्ष २०१८ पासून अंकिताला ‘सिस्टिमिक ल्यूपस एरिथमॅटोसिस’ (‘एस्.एल्.ई.’) (टीप) या दुर्धर व्याधीमुळे अनेक शारीरिक त्रास होऊ लागले. प्रती मास तिला उपचारांसाठी मुंबईतील ‘के.ई.एम्’ या रुग्णालयात न्यावे लागायचे. नंतर कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे दळणवळण बंदी लागू झाली आणि तिला रुग्णालयात नेणे अशक्य झाले. त्यामुळे तिच्या मूत्रपिंडावर (किडनीवर) परिणाम झाला. नंतर तिला कोरोनाचा संसर्गही झाला आणि तिची स्थिती पुष्कळ खालावली. २५.१०.२०२२ या दिवशी मुंबईतील ‘के.इ.एम्’ रुग्णालयातच अंकिताचे निधन झाले. अंकिताच्या आजारपणात अनुभवलेली गुरुकृपा आणि तिच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती येथे दिल्या आहेत. या लेखाचा पहिला भाग ५ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाला.

(भाग २)

(टीप : सिस्टिमिक ल्यूपस एरिथेमॅटोसिस (एस.एल्.ई.) : या व्याधीत रुग्णाच्या शरिरातील पेशी रुग्णाच्याच शरिरातील अन्य काही पेशींना शत्रू समजून त्यांच्या विरुद्ध लढतात. त्यातून ही व्याधी उत्पन्न होते. या व्याधीमध्ये शरिरातील विविध संस्था आणि अवयव यांची कार्यक्षमता हळूहळू न्यून होत जाते.)

कै. (कु.) अंकिता वाघ

५. सौ. ललिता कदम (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, अंकिताची मोठी बहीण) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सौ. ललिता कदम

५ ऊ ६. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायाने श्वास घेतांना होणारा त्रास २ घंट्यांत पूर्णपणे थांबणे : त्यानंतर अंकिताच ‘आता घरी जाऊया’, असे म्हणू लागल्यामुळे आम्ही तिला घरी आणले. घरी आल्यावर तिला अकस्मात् श्वास घ्यायला पुष्कळ त्रास होऊ लागला. आम्ही तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेलो; पण त्यांनी तिला तपासण्यास नकार दिला आणि आम्हाला अन्य रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. आम्ही सद्गुरु गाडगीळकाकांना नामजपादी उपाय विचारले. त्यांनी सांगितलेला नामजप केल्यावर २ घंट्यांत अंकिताला श्वास घेतांना होणारा त्रास पूर्णपणे थांबला.’

५ ए. गुरुकृपेने सुसह्य झालेले अंकिताचे आजारपण

५ ए १. रुग्णाईत असूनही आनंदी दिसणारी आणि लहान बाळाप्रमाणे निरागस वाटणारी अंकिता ! : पुष्कळ आजारी असूनही अंकिता अखेरपर्यंत आनंदी आणि प्रसन्न दिसत होती. रुग्णाईत व्यक्तीचा चेहरा एकदम त्रासलेला असतो किंवा ती व्यक्ती चिडचिड करत असते; पण अंकिता एखाद्या गोंडस बाळासारखी दिसत होती. आम्ही सर्व जण नकळतपणे ४ – ५ वर्षांच्या मुलीशी बोलतो, तशा पद्धतीने अंकिताशी बोलायचो. तिला भेटायला येणारे साधक, नातेवाईक आणि आधुनिक वैद्य हे सर्वही तिच्याशी लहान मुलीशी बोलल्याप्रमाणेच बोलायचे. काही आधुनिक वैद्य आणि परिचारिका अन्य रुग्णांवर ओरडायच्या किंवा चिडचिड करायच्या; पण ते अंकिताशी अगदी प्रेमाने वागायचे.

५ ए २. शरिरावर जखमा असूनही अंकिताला अधिक वेदना न होणे : अंकिताला नागीण होऊन तिच्या शरिरावर जखमा झाल्या. तेव्हापासून ती २४ घंटे सतत झोपूनच रहायची. नागीण झाल्यावर अथवा एवढ्या जखमा झाल्यावर पुष्कळ वेदना होतात; मात्र तिला तशा वेदना होत नव्हत्या. केवळ देवाच्याच कृपेमुळे तिला इतक्या शारीरिक त्रासांतही वेदना न होता गाढ झोप लागत होती.

५ ए ३. अंकिताला भरती केलेल्या रुग्णालयात त्रासदायक स्पंदने जाणवणे; पण तिच्या पलंगाजवळ आल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण होऊन चैतन्य जाणवणे : अंकिताला मुंबईतील ‘के.ई.एम्.’ रुग्णालयात भरती केले होते. रुग्णालयाच्या फाटकाजवळ जाताक्षणी माझ्या मनाला पुष्कळ दुःखदायी स्पंदने आणि त्रास जाणवायचा; मात्र तिथून अंकिताच्या पलंगाजवळ आल्यावर पुष्कळ चांगले वाटून प.पू. गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) स्मरण व्हायचे. तिच्या पलंगाकडे पहातांना चैतन्य जाणवून प्रसन्न वाटायचे. तिच्या पलंगापासून दुसरीकडे कुठेही गेले, तरी मनाला पुन्हा त्रासदायक
स्पंदने जाणवायची.

५ ए ४. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, या ग्रंथावरील छायाचित्र पिवळे होणे : रुग्णालयात अंकिताजवळ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ ठेवला होता. त्या ग्रंथावरील त्यांचे छायाचित्र पुष्कळ पिवळे दिसत होते. ते पाहून क्षणभर ‘मला हा भास होत आहे का ? किंवा मी झोपेत नाही ना ?’, असे मला वाटायचे.

५ ऐ. पू. (सौ.) संगीता जाधव यांनी रुग्णालयात येऊन अंकिताची घेतलेली भेट !

५ ऐ १. पू. जाधवकाकूंची भेट झाल्यावर अंकिताला भावाश्रू येणे : मी अंकिताला सांगितले, ‘‘सद्गुरु अनुराधा वाडेकर (सद्गुरु अनुताई) आणि पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या समष्टी संत) तुला भेटायला रुग्णालयात येणार आहेत.’’ ते ऐकून तिच्या डोळ्यांत भावाश्रू आले. नंतर पू. जाधवकाकू तिला भेटायला रुग्णालयात आल्या. त्यांना बघताक्षणी अंकिताने नमस्कार केला. तेव्हा तिच्या डोळ्यांतून पुष्कळ वेळ भावाश्रू वहात होते. तिचा चेहरा एकदम चैतन्यमय झाला होता. तिचा तो भाव पाहून आमच्याही डोळ्यांत भावाश्रू आले.

५ ऐ २. ‘व्हिडिओ कॉल’द्वारे सद्गुरु अनुताईंची झालेली भावस्पर्शी भेट ! : काही कारणांनी सद्गुरु अनुताई रुग्णालयात येऊ न शकल्याने पू. जाधवकाकूंनी त्यांना ‘व्हिडिओ कॉल’ केला. तेव्हा अंकिताला उठून बसणे शक्य होत नव्हते, तरी तिने ‘मला उठवून बसवा’, असे सांगितले. सद्गुरु अनुताईंनी अंकिताला पाहिल्यावर बराच वेळ नमस्काराची मुद्रा केली आणि त्यांना भावाश्रू आले. ते पाहून आम्हा सर्वांच्याच डोळ्यांमध्ये भावाश्रू आले.

५ ऐ ३. ‘अंकिताच्या पलंगाभोवती चांगली प्रभावळ निर्माण झाली असून अंकिताला भेटल्यावर पुष्कळ आनंद जाणवला’, असे पू. जाधवकाकू यांनी सांगणे : पू. जाधवकाकू म्हणाल्या, ‘‘रुग्णालयातील वातावरण पाहून ‘अंकिताची स्थिती कशी असेल ?’, असे मला वाटले होते; पण तिच्या पलंगाजवळ आल्यावर ‘मी रामनाथी आश्रमातच आले आहे’, असे मला वाटत आहे. तिच्या पलंगाभोवती चांगली प्रभावळ निर्माण झाली असून पुष्कळ आनंद जाणवत आहे. तिची साधना अंतर्मनातून चालू आहे. त्यामुळे पुष्कळ आनंद जाणवत आहे. रुग्णालयात रुग्णाला भेटल्यावर त्याला होणारे त्रास पाहून वाईट वाटते; पण अंकिताला भेटल्यावर पुष्कळ आनंद जाणवतो. तिचे त्रास पाहून ‘तिचा हा जन्म प्रारब्धभोग संपवण्यासाठीच झाला आहे’, असे मला वाटत आहे.’’

५ ऐ ४. अंकिताच्या पलंगाजवळ पुष्कळ चैतन्य असल्यामुळे ‘तिच्या जवळ बसल्यावर सहजतेने नामजप होतो’, असे पू. जाधवकाकूंनी सांगणे : रुग्णालयात अंकिताजवळ बसल्यावर माझा सहज १० घंटे नामजप होत असे; पण घरी गेल्यावर तेवढा नामजप पूर्ण करण्यास मला पुष्कळ प्रयत्न करावे लागायचे. ‘रुग्णालयात रज-तम वातावरण असूनही तिथे नामजप होतो आणि घरी होत नाही’, याचे मला आश्चर्य वाटायचे. ही अनुभूती मी पू. जाधवकाकूंना सांगितल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘अंकिताच्या पलंगाभोवती पुष्कळ चैतन्य आहे. त्यामुळे तिच्या जवळ बसल्यावर कुणाचाही नामजप चालू होईल !’’

५ ऐ ५. ग्रंथावरील परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रात पालट झाल्याचे पाहिल्यावर ‘गुरुदेव सतत अंकिताच्या समवेत असून तिचे सर्व त्रास त्यांनी स्वतःवर घेतले आहेत’, असे पू. जाधवकाकूंनी सांगणे : अंकिताजवळ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ ठेवला होता. या ग्रंथावरील प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्रात पालट होऊन त्याला पिवळसर झाक आली आहे. ते छायाचित्र पाहिल्यावर
पू. काकू म्हणाल्या, ‘‘छायाचित्रातील गुरुदेवांचा चेहरा अंकिताच्या चेहर्‍याप्रमाणे दिसत आहे. असे वाटत आहे की, परम पूज्यांनी तिचे सर्व त्रास स्वतःवर घेतले आहेत. भलेही तिला पुष्कळ शारीरिक त्रास आणि वेदना आहेत; पण प.पू. गुरुदेव सतत तिच्या समवेतच आहेत.’’

५ ऐ ६. अंकिता दिवसभर झोपून रहाण्यामागचे पू. जाधवकाकूंनी सांगितलेले कारण : मी पू. जाधवकाकूंना सांगितले, ‘‘अंकिता दिवसभर नुसती झोपते.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘तिला पुष्कळ शारीरिक त्रास होत आहेत. आईला आपल्या बाळाच्या वेदना बघवत नाहीत, तसे परात्पर गुरु डॉक्टरांनाही तिच्या वेदना बघवत नाहीत; म्हणून देव तिला झोपवून ठेवतो.’’

‘अंकिताच्या प्रदीर्घ आणि दुर्धर अशा आजारपणात परात्पर गुरु डॉक्टर आणि सनातनचे संत यांनी क्षणोक्षणी अंकिताची काळजी घेतली’, याबद्दल मी त्यांच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

५ ओ. अंकिताच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

१. २५.१०.२०२२ या दिवशी मुंबईतील ‘के.इ.एम्.’ रुग्णालयातच अंकिताचे निधन झाले. तेव्हा तेथील परिचारिकांना वाईट वाटले आणि आधुनिक वैद्यांच्याही डोळ्यांत पाणी आले.

२. एका परिचारिकेला अंकिताच्या निधनाबद्दल समजल्यावर तिला पुष्कळ वाईट वाटले. ती म्हणाली, ‘‘अंकिता पुष्कळ चांगली होती.’’

६. श्री. शुभम् वाघ (अंकिताचा भाऊ), वापी, गुजरात.

श्री. शुभम् वाघ

अ. ‘अंत्यविधीला नेण्यापूर्वी अंकिताला अखेरची अंघोळ घालण्यात आली. नंतर सर्वांनी तिचे आवरले. तेव्हा ‘अंकिता साक्षात् श्री भवानीदेवी सारखी दिसत आहे’, असे मला जाणवले.

आ. मी अंकिताच्या मृतदेहाला नमस्कार कला. तेव्हा ‘माझ्यासमोर साक्षात् श्री भवानीदेवी आहे आणि माझ्या शरिरात चैतन्य जात आहे ’, असे मला वाटले.’

(समाप्त)

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २९.१०.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक