तमिळनाडूमध्ये कोईम्बतूर येथे एका मंदिराजवळ सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना १० दिवसांपूर्वी घडली, तशी ती वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. सिलिंडरचा स्फोट म्हणून त्या बातमीची देशवासियांनी विशेष नोंद घेतली नाही; मात्र आता १० दिवसांनंतर भाजपचे तेथील प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी ‘हा निवळ सिलिंडरचा स्फोट नव्हता, तर जाणीवपूर्वक घडवलेला घातपाताचा प्रयत्न होता’, असे सांगितले. यातील मृत्यूमुखी पडलेल्या आतंकवाद्याचे नाव आहे जमीशा मुबीन ! श्री कोट्टई ईश्वरम् मंदिराजवळ स्फोट घडवण्यात या धर्मांधाचा सहभाग आहे. त्याने खिळे आणि गॅस सिलिंडरने पूर्ण भरलेली गाडी मंदिराबाहेर नेऊन आत्मघातकी स्फोट घडवून आणला. त्यापूर्वी त्याने स्वत:च्या शरिरावरील केस काढले होते आणि ‘जिहाद चालू करू’, असे सांगितले होते. अण्णामलाई यांनी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (‘एन्.आय.ए.’ला) या स्फोटाचे अन्वेषण करण्यास सांगितल्याने हे सर्व उघड झाले. अन्यथा तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी स्फोटानंतर अनेक दिवस ‘तो सिलिंडरचा स्फोट होता’, असे सांगून हे आतंकवादी आक्रमण दाबण्याचा आणि सत्य बाहेर येऊ न देता लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
एन्.आय.ए.ने केलेल्या अन्वेषणात मुबीन याच्या घरात १०० किलो स्फोटके सापडली आहेत. या स्फोटाशी संबंधित पकडण्यात आलेले ५ ही जण हे धर्मांध आहेत. स्फोट घडवलेले ठिकाण धार्मिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाण आहे. मुबीन याची वर्ष २०१९ मध्ये एन्.आय.ए.कडून चौकशी करण्यात आली आहे. त्या वेळी त्याचा कारवायांमध्ये प्रत्यक्ष सहभाग नसला, तरी अन्य सहभागी व्यक्तींच्या समवेत त्याचे संबंध होते. त्या दिशेने एन्.आय.ए. अन्वेषण करणार आहे. तमिळनाडूमध्ये आतंकवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे, तेथील हिंदूंवरील आक्रमणांमध्येही वाढ झाली आहे. ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची एक शाखा तमिळनाडूत चालू करा’, अशी मागणी अण्णामलाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काही वर्षांपूर्वी केली आणि त्याचा ते पाठपुरावाही घेत आहे. तमिळनाडूत आतंकवादाचा धोका जो अण्णामलाई यांना लक्षात आला, तो मुख्यमंत्री स्टॅलिन यांना का लक्षात आला नाही ? स्टॅलिन यांच्या मानेवर अजूनही पेरियार यांनी निर्माण केलेले द्रविड आणि आर्य यांच्यातील तथाकथित वादाचे भूत आहे. तसेच ते हिंदीविरोधी आणि हिंदुत्वविरोधी आहेत. तमिळनाडूमध्ये काही हिंदुत्वनिष्ठांवर प्राणघातक आक्रमणे झाली आणि त्यात त्यांची हत्या झाली. तेथील हिंदुत्वनिष्ठांना आतंकवाद्यांकडून धमक्या मिळतात, तेव्हा पोलीस संरक्षणही काही प्रमाणात पुरवले जाते; मात्र तरीही जिवंत राहू कि नाही ? याची शाश्वती नाही. या सर्वांतून तमिळनाडूला हिंदु किंवा राष्ट्र यांच्या हिताच्या विरोधातील नवीन प्रयोगशाळा बनवण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका प्रबळ होण्यास वाव आहे. कोईम्बतूर येथील आक्रमणाचे अन्वेषण करतांना अन्वेषण यंत्रणेने आतंकवाद्यांनी निर्माण केलेली सर्व यंत्रणा मोडून काढणे अपेक्षित आहे !