एकादशीचे माहात्म्य

आज ४ नोव्हेंबर २०२२ या दिवशी ‘कार्तिक एकादशी’ आहे. त्या निमित्ताने…

परात्पर गुरु (कै.) परशराम माधव पांडे

१. आषाढ आणि कार्तिक मासांतील एकादशींचे महत्त्व 

कोणत्या तरी विशिष्ट वाराला, तिथीला अथवा कोणत्या तरी मासात विशिष्ट देवतांची स्पंदने पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतात. तो काळ त्या देवतेचा काळ मानला जातो. वर्षभरात २४ वेळा येणार्‍या एकादशींच्या तुलनेत आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्ल पक्षात येणार्‍या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे.

२. एकादशीमधील अकरा (११) या अंकाचे वर्णन

अ. ‘अकराव्या पूजास्थानाची, म्हणजे सर्व भूतांची पूजा करावी’, असे संत एकनाथांनी म्हटले आहे. पहिला १ हा ‘पूज्य’ (भगवंत, परमात्मा) आणि दुसरा १ हा ‘पूजक (आत्मा) आहे.’ पूज्य आणि पूजक दोन्हीकडे ‘एकच (१)’ आहे, म्हणजे ऐक्य झाले. ११ हा आकडा १० इंद्रिये आणि १ मन मिळून देहातील जाणिवेचे प्रतीक आहे. ती जाणीव सर्व प्राणिमात्रांत आहे; म्हणून त्याने सर्व भूतांची पूजा होते. जो स्वतःचे सर्व भोग भगवंताला अर्पण करण्याची भावना ठेवतो, तोच आत्मतत्त्व जाणतो. तेच सर्वत्र समत्वाने आहे.’ (संदर्भ : सार्थ श्री एकनाथी भागवत, अध्याय ११, ओवी १४४७ ते १४४९)

आ. आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या तिथींना पंढरपूरची यात्रा असते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकर्‍यांनी एकादशी करावयाची (एक + दहा) म्हणजे एक मन आणि दहा इंद्रिये संपूर्णतः पांडुरंगाला अर्पण करायची. पांडुरंगाच्या ओढीने ही वारी नियमितपणे प्रतिवर्षी करणारा तो ‘वारकरी !’

– संकलक : परात्पर गुरु (कै.) परशराम माधव पांडे

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)’)