हिंदु युवतींना ‘टार्गेट’ केल्यास आम्ही गप्प बसणार नाही ! – नितेश राणे, आमदार, भाजप

नितेश राणे, आमदार, भाजप

कोल्हापूर – गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांची प्रकरणे समोर येत आहेत. या प्रकरणांत गुन्हा नोंद असूनही पोलीस अन्वेषण करत नाहीत. गुन्हा घडल्यावर १५ दिवस उलटूनही अन्वेषण होत नाही. पोलीस अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. दबाव वाढवल्यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंदवला जातो. महाराष्ट्रात मुलींना पळवून नेण्यासाठी ‘रेट कार्ड’ लागले आहे. हिंदु युवतींना फसवण्यासाठी मुसलमान तरुणांना पैसे आणि दुचाकी गाड्या दिल्या जात आहेत. हे असेच चालू राहिल्यास आणि यापुढेही हिंदु युवतींना ‘टार्गेट’ केल्यास आम्ही गप्प बसणार नाही, तसेच या प्रकरणातील हिंदु युवती परत न आल्यास तांडव करू, अशी चेतावणी भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांनी दिली. ते कोल्हापुर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोल्हापूर येथे १४ वर्षीय युवतीचे २२ वर्षीय अल्फाफ काझी या मुसलमान युवकाने अपहरण केले आहे. त्या संदर्भात कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनास नितेश राणे यांनी भेट दिली. यानंतर ते जुना राजवाडा येथे पोलिसांना भेटले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

१. महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने पोलीस उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे हिवाळी अधिवेशानात धर्मांतरविरोधी कायदा आणावा, अशी मागणी मी करणार आहे.

२. काही जिहादी तरुण प्रेम करतात, नंतर विवाह करतात आणि त्या मुलींचे धर्मांतर केले जाते. अनेक युवती गायब होतात. त्यानंतर त्यांना सौदी अरेबिया आणि अरब देशांत पळवून नेले जाते. पोलीस अधिकारी जोपर्यंत अशांना शिक्षा होण्यासाठी कठोर प्रयत्न करणार नाहीत, तोपर्यंत हे थांबणार नाही.

३. आज एक कडवट हिंदुत्वनिष्ठ व्यक्ती गृहमंत्री म्हणून बसली आहे, हे पोलिसांनी लक्षात ठेवावे. पोलिसांना आजही वाटते आहे की, महाविकास आघाडीचे सरकार आहे; मात्र आता सरकार पालटले आहे, हे पोलिसांनी लक्षात ठेवावे.