ठाणे, २ नोव्हेंबर (वार्ता.) – डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ बेशिस्तपणे रिक्शा उभ्या करणार्या चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई चालू केल्याने रेल्वे स्थानक परिसर मोकळा झाला आहे. या चालकांवर २ सहस्र रुपये दंडापासून रिक्शा जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
‘रिक्शाचालकांनी भान ठेवून नियमभंग न करता प्रवासी वाहतूक करावी’, असे आवाहन मागील ७ ते ८ मासांपासून डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्याकडून शहरातील रिक्शाचालकांना केले जात आहे. वाहतुकीचा नियमभंग करणार्यांसाठी, तसेच वाहतूक शुल्काची माहिती देण्यासाठी रिक्शांच्या वाहनतळांवर ‘चालक जागृती उपक्रम’ वाहतूक पोलिसांनी अनेक वेळा राबवले आहेत. असे असले तरी वाहतूक पोलिसांची पाठ फिरल्यावर रिक्शाचालकांकडून रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ बेशिस्तपणे गर्दी केली जाते. त्यामुळे रेल्वेस्थानकातून बाहेर पडतांना बर्याचदा प्रवाशांचे रिक्शाचालकांशी खटके उडल्याच्या घटना घडतात. बर्याचदा रिक्शाचालकांकडून अरेरावीची भाषा केली जाते. या सर्वच प्रकाराला कंटाळून नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.