आदेश मिळाल्यास मागे वळून पहाणार नाही ! – लेफ्टनंट जनरल ए.डी.एस्. औजला

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तान यांविषयी केलेल्या विधानावरून सैन्याधिकार्‍यांनी व्यक्त केले मत !

डावीकडून कमांडर लेफ्टनंट जनरल ए.डी.एस्. औजला आणि भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – कोणतेही आदेश मिळाल्यास कारवाई करण्यास सैन्य पूर्णपणे सिद्ध आहे. आम्ही आमच्या क्षमतेत आणखी वाढ करत आहोत. आदेश मिळाल्यास आम्ही मागे वळून पहाणार नाही, असे विधान भारतीय सैन्याच्या चिनार कोर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल ए.डी.एस्. औजला यांनी केले. ते येथील कोर्प्स मुख्यालयातील पत्रकार परिषदेत बोलत होते. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तान यांविषयी केलेल्या विधानावरून औजला यांनी हे विधान केले.

राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, भारत पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागांपर्यंत पोचल्यानंतरच काश्मीरच्या संपूर्ण विकासाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांवर पाकिस्तानकडून अत्याचार होत असून त्याचे पाकला गंभीर परिणाम भोगावे लागतील. पाकिस्तानच्या अवैध नियंत्रणाखाली असलेला भाग परत मिळवण्याविषयी वर्ष १९९४ मध्ये संसदेने केलेल्या ठरावाच्या संदर्भात त्यांनी हे विधान केले होते.

संपादकीय भूमिका

भारतीय सैन्याला पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा आदेश देण्यात काय अडचण आहे, हे जनतेला समजले पाहिजे !