‘रामायण’ या मालिकेत रावणाची, म्हणजे खलनायकाची भूमिका साकारूनही हृदयमंदिरातील श्रीरामभक्तीमुळे खर्‍या जीवनात ‘महानायक’ ठरलेले (कै.) अरविंद त्रिवेदी !

कुठे प्रभु श्रीराम आणि शिव यांची पूजा करून भूमिका साकारणारे पूर्वीचे कलाकार अन् कुठे पैशासाठी विडंबन करणारे आताचे कलाकार 

रावणाच्या भूमिकेतील अरविंद त्रिवेदी

‘पूर्वी चित्रपट, नाटके आणि लोकगीते यांतून लोकांसमोर नायकाचे आदर्श व्यक्तीमत्त्व उभे रहात असे; मात्र सध्याचे अनेक चित्रपट पाहिले, तर आपल्या लक्षात येते, ‘लोकांना ‘नायका’पेक्षा ‘खलनायक’च अधिक आवडू लागला आहे. सध्याच्या काळात चित्रपटांमध्ये खलनायकाचेच गडद चित्रण केले जाते. आता ‘आदिपुरुष’ हा प्रभु श्रीरामांवर आधारित चित्रपट येत आहे. त्यात साकार केलेले रावणाचे पात्र हे परकीय आक्रमक अल्लाउद्दीन खिलजीसारखे दिसणारे आहे. यावरून हिंदूंमध्ये या चित्रपटाच्या विरोधात रोष आहे.

या पूर्वी परिस्थिती वेगळी होती. मागच्या पिढीतील कलाकार नायकाच्या भूमिकेप्रमाणे खलनायकाची भूमिकाही भावभक्तीने साकारत असत. यांतील अग्रणी उदाहरण म्हणजे कै. रामानंद सागरनिर्मित ‘रामायण’ या मालिकेतील रावणाची भूमिका साकारणारे कै. अरविंद त्रिवेदी ! ‘पहाडी आवाज, बलशाली शरीरयष्टी आणि दमदार संवाद’, यांमुळे त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी रावणाची भूमिका साकारूनही त्यांच्या मनात प्रभु रामचंद्राविषयी अपरंपार भक्ती होती. आताचे कलाकार त्यांचे अनुकरण करून भूमिका साकार करतील का ?

(कै.) अरविंद त्रिवेदी

 १. अरविंद त्रिवेदी यांचा परिचय

अरविंद त्रिवेदी यांचा जन्म ८.११.१९३७ या दिवशी इंदूर (मध्यप्रदेश) येथे झाला. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यांनी ३०० हून अधिक हिंदी आणि गुजराती चित्रपटांत अन् रंगभूमीवर काम केले. ते भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेची निवडूक लढवून खासदार झाले. नंतरच्या कालावधीत मात्र त्यांनी विशेष भूमिका केल्या नाहीत. त्यांनी रामभक्तीत जीवन समर्पित केले. ५.१०.२०२१ या दिवशी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूच्या वेळी त्यांचे वय ८३ वर्षे होते.

२. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत अरविंद त्रिवेदी यांनी साकार केलेली रावणाची भूमिका

२ अ. ‘रामायण’ या मालिकेत प्रभु रामचंद्राला नदी पार करून देणार्‍या नावाड्याची भूमिका करायला मिळावी’, अशी अरविंद त्रिवेदी यांची इच्छा असणे : वर्ष १९८६ च्या काळात रामानंद सागर यांनी ‘रामायण’ या मालिकेसाठी पात्रांची निवडप्रक्रिया चालू केली. अरविंद त्रिवेदी यांना याविषयी समजल्यावर त्यांना या मालिकेत लहानशी भूमिका करण्याची इच्छा झाली. त्या दृष्टीने ते चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन रामानंद सागर यांना भेटले. तेव्हा ते रामानंद सागर यांना म्हणाले, ‘‘मला प्रभु रामचंद्राला नदी पार करून देणार्‍या नावाड्याची भूमिका सादर करण्याची इच्छा आहे. या भूमिकेच्या माध्यमातून माझ्याकडून प्रभु रामचंद्राची सेवा होईल आणि माझे जीवन सफल होईल. त्या नावाड्याला प्रभु रामचंद्राचे चरणस्पर्श करण्याचे भाग्य लाभले होते. मीही प्रभु श्रीरामाची पाद्यपूजा करून माझी भक्ती प्रकट करू शकीन.’’

२ आ. रामानंद सागर यांनी अरविंद त्रिवेदी यांचे व्यक्तीमत्त्व आणि रामभक्ती बघून त्यांची रावणाच्या भूमिकेसाठी निवड करणे : त्यांचे बोलणे ऐकून रामानंद सागर यांनी त्यांना काही संवाद म्हणायला सांगितले. तेव्हा अरविंद यांचे व्यक्तीमत्त्व, त्यांची चालण्याची पद्धत आणि प्रामुख्याने त्यांची रामभक्ती बघून त्यांची रावणाच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. तेव्हा रामानंद सागर म्हणाले, ‘‘मुझे ऐसाही रावण चाहिए था, जिसमें ‘शक्ती’ भी हो और ‘भक्ती’ भी हो ।’’
(‘रामानंद सागर यांनी केवळ व्यक्तीमत्त्व न बघता अरविंद त्रिवेदी यांच्यातील भक्तीभावाच्या आधारे त्यांना रावणाच्या भूमिकेसाठी निवडले. यातून ‘त्या काळी कलाकारांची निवडप्रक्रिया किती योग्य प्रकारे केली जात होती !’, हे लक्षात येते.’ – संकलक)

२ इ. अरविंद त्रिवेदी यांनी चित्रीकरणापूर्वी प्रभु श्रीराम आणि शिव यांची पूजा करणे, चित्रीकरणाच्या दिवशी दिवसभर उपवास करणे अन् रात्री रावणाचा वेश पालटूनच भोजन करणे :

एका वृत्तपत्रातील लेखातून आमच्या लक्षात आले, ‘अरविंद त्रिवेदी राम आणि शिव यांचे भक्त होते. अरविंद त्रिवेदी यांना ही भूमिका करतांना प्रतिदिन जड अलंकार आणि मुकुट परिधान करावा लागत असे. त्यांच्यासाठी ‘रावणाचे पात्र साकारणे’, हे एक मोठे आव्हान होते. या लेखात अनुभवकथन करतांना ते सांगतात, ‘चित्रीकरण करायला जाण्यापूर्वी मला मनातल्या मनात रडू यायचे. ‘संहितेनुसार माझे आराध्य दैवत असलेल्या प्रभु श्रीरामाला उलट बोलणे आणि श्रीरामाला विरोध करणे’, हा माझा नाईलाज होता. चित्रीकरणापूर्वी मी प्रभु श्रीराम आणि शिव यांची पूजा करायचो. त्यानंतर चित्रीकरणाच्या वेळी मी पूर्ण दिवस उपवास करायचो. चित्रीकरण संपल्यावर रात्री रावणाची वेशभूषा पालटूनच मी उपवास सोडायचो आणि भोजन करायचो.’
(‘मनात श्रीरामाविषयी अपार भक्ती असणारे महान कलाकार अरविंद त्रिवेदी !’ – संकलक)

३. रावणाची भूमिका साकारल्यामुळे ‘रावण’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अरविंद त्रिवेदी यांना हनुमानाच्या मंदिरातील पुजार्‍यांनी मंदिरात प्रवेश करू न देणे  

‘रामायण’ ही मालिका भारतातच नव्हे, तर विदेशातही गाजली. लोक अरविंद त्रिवेदी यांना ‘रावण’ या रूपात ओळखू लागले होते. या संदर्भात त्यांना एक वाईट अनुभव आला. एकदा ते हनुमानगढी (अयोध्या) येथे मंदिरात दर्शन घ्यायला गेले. तेव्हा तेथील पुजार्‍यांनी त्यांना अडवले. पुजारी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही प्रभु श्रीरामचंद्र आणि हनुमान यांच्याविषयी अवमानजनक शब्द वापरले आहेत. तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकत नाही.’’ त्यानंतर त्रिवेदी यांनी अनेक वेळा विनवणी करूनही त्यांना मंदिरात प्रवेश मिळू शकला नाही.’
(‘यातून त्या काळच्या लोकांची भक्तीही दिसून येते. त्या वेळी ‘त्रिवेदी यांना त्या मंदिरात प्रवेश मिळाला नाही’, हे दुर्दैव ! मात्र ‘खलनायक’ साकारूनही त्यांच्या हृदयमंदिरातील भक्तीमुळे ते खर्‍या जीवनात ‘महानायक’ ठरले’, असे म्हणावे लागेल.’ – संकलक)

कु. म्रिण्मयी केळशीकर,
कु. रेणुका कुलकर्णी

(साभार : संकेतस्थळ)
संग्राहक : कु. रेणुका कुलकर्णी आणि कु. म्रिण्मयी केळशीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.१०.२०२१)