गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांची संख्या वाढत आहे. यामध्ये सामान्य व्यक्तींपासून ते राजकारणी, उद्योगपती यांनाही यात जीव गमवावा लागला आहे. अपघातांचा अभ्यास केल्यास प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच अल्प होऊ शकते. यामध्ये शिरस्त्राण परिधान करणे, चुकीच्या बाजूने ‘ओव्हरटेक’ न करणे, ‘सिग्नल’ पाळणे, ‘सीट बेल्ट’ लावणे आदी प्राथमिक टप्प्याच्या नियमांचे पालन न केल्यास वाहतूक पोलीस आपल्याला दंड करतात, तरीही स्वतःच्या लाभासाठी असणार्या नियमांचे उल्लंघन करणारेही अनेक जण आहेत. येथे मात्र मानवी चुकांमुळे अपघात होतात, हे नक्की; पण वाहतूकधारकाची चूक नसतांना प्रशासकीय उदासीनतेमुळे सामान्य जनतेला जीव गमवावा लागत असेल, तर त्याचे दायित्व कुणाकडे ? ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी २०१८’च्या अहवालानुसार अपघातांमधील मृत्यूंपैकी ५ टक्के मृत्यू हे रस्त्यातील खड्ड्यांमुळे होतात. यामुळे ‘रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणार्या अपघातांना रस्ते अधिकारीच उत्तरदायी आहेत’, हे न्यायालयाने मान्य केले आहे.
‘रस्त्याच्या देखभालीसाठी उत्तरदायी अभियंत्याला ‘रस्त्याच्या हानीची कल्पना होती’, हे नोंद असेल, तर त्यांना ‘एफ्.आय.आर्.’मध्ये (प्रथमदर्शी माहिती अहवालात) सहआरोपी केले जाऊ शकते. वाहतूक पोलीस किंवा इतर कुणी पत्र पाठवूनही सुधारणा झाली नसेल आणि अपघात झाला, तर अधिकार्यांना दोषी ठरवले जाऊ शकते. तसेच विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होऊ शकतो.’ सर्वसामान्यांना याविषयी माहिती नसल्याने कुणी वरीलप्रमाणे रस्ते दुरवस्थेला उत्तरदायी असणार्यांच्या विरुद्ध तक्रार प्रविष्ट करत नाही. त्यामुळे अपघात खड्ड्यांमुळे झाला असेल, तर तसे तक्रारीत लिहिणे, तसेच हलगर्जीपणे वाहन चालवून अपघात करणार्या चालकांसमवेतच रस्त्याशी संबंधित अधिकार्यांना आरोपी करण्यासाठी तक्रारदाराने जागृत रहावे. अशा प्रकारे जनता रस्ते अधिकार्यांवर वचक ठेवू शकते.
रस्ते अपघातांमध्ये खड्ड्यांसमवेत वाहने सुसाट वेगाने चालवणे, महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, ही कारणेही आहेत. रात्रीच्या वेळी बर्यादा ट्रकचालक, तसेच प्रवासी वाहतूक करणारे चालक हे मद्य पिऊन वाहने चालवतांना आढळतात. हे सर्व पाहिल्यास जनतेने सतर्क होऊन स्वतः नियम पाळणे आणि न पाळणार्यांच्या विरुद्ध वैध मार्गाने आवाज उठवणे आवश्यक आहे.
– श्री. जयेश बोरसे, पुणे