१३४ लोकांच्या मृत्यूला उत्तरदायी कोण ?

गुजरातच्या मोरबी येथील १४३ वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याने देशात हळहळ !

भारतात पूल कोसळण्याच्या घटना अल्प नाहीत. भारतात ब्रिटिशांनी बांधलेले पूल अद्यापही चांगल्या स्थितीत आहेत, तर भारतियांनी स्वातंत्र्यानंतर बांधलेले मोठमोठे पूल काही वर्षांत किंवा काही मासांतच कोसळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटना जनतेने पाहिलेल्या आहेत; मात्र एखादा पादचारी पूल किंवा पर्यटनस्थळ म्हणून वापर होणारा पूल कोसळून १३४ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना प्रथमच घडली आहे. गुजरातच्या मोरबी येथील १४३ वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याने देशातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. ही घटना अत्यंत दुःखकारक असल्याने ती घडण्यामागील कारणांचा शोध घेऊन भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागणार आहे. भारतात एखादी घटना घडल्यावर त्यामागील कारण शोधून त्यावर तितक्याच गांभीर्याने उपाययोजना काढली जाते आणि मग भविष्यात तशी घटना घडत नाही, असे होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. प्रत्यक्ष उदाहरण द्यायचे झाल्यास भारतीय वायूदलातील मिग-२७ विमाने होत. आतापर्यंत या विमानांचे अनेक अपघात होऊनही आणि होत असूनही ती विमाने अद्यापही भारतीय वायूदलामध्ये तैनात आहेत. मोरबी पुलानंतर अन्य ठिकाणी भविष्यात अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत, याची अपेक्षा करणेच सध्या आपल्या हातात आहे. मोरबी पुलाच्या अपघातामागील कारणांचा आता शोध घेण्यात येत आहे. हा झुलता पूल मच्छु नदीवर वर्ष १८८९ मध्ये तेथील तत्कालीन राजे वाघवी रावाजी ठाकोर यांनी त्या वेळच्या अत्यंत प्रगत अशा युरोपीय तंत्रज्ञानाद्वारे बांधून घेतला होता. लोखंडी तारांचा म्हणजे केबलचा हा झुलता पूल होता. ब्रिटिशांच्या काळातील या पुलाचे अनेकांनी कौतुक केले होते. हा पूल अभियांत्रिकीचा एक आदर्श होता. इतक्या वर्षांमध्ये पुलावर कोणताही अपघात झाला नव्हता. विशेष म्हणजे हा पूल जेव्हा ठाकोर राजाकडून बांधण्यात आला, तो या नदीच्या किनारी असलेल्या त्याच्या गडावरून नदीच्या दुसर्‍या किनार्‍याकडील गडाच्या दुसर्‍या भागात जाण्यासाठी वैयक्तिक वापरासाठी बांधण्यात आला होता. त्या वेळी राजपरिवारातील लोक याचा वापर करत असत. तेव्हा हा पूल १०० हून अधिक लोकांसाठी  वापर करण्याच्या उद्देशाने बांधण्यात आला नव्हता. तो पर्यटनासाठी वापरण्यात येऊ लागल्यावर त्यावरून मोठ्या प्रमाणात लोक जाऊ लागले. त्यामुळे १४३ वर्षे जुन्या लोखंडी तारा त्यांचा भार पेलू शकल्या नाहीत आणि पूल कोसळला.

१४३ वर्षांच्या जुन्या पुलाच्या सळ्यांना लाथा मारतांनाचे व्हिडीओ व्हायरल !

शिक्षा होईल का ?

या पुलाची देखभाल आणि दुरुस्ती नियमित केली जात होती. आताही तो नूतनीकरणासाठी गेले ७ मास बंद होता. या पुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ‘ऊरेवा’ नावाच्या एका आस्थापनाला १५ वर्षांचे कंत्राट देण्यात आले होते. पुलाच्या नूतनीकरणावर २ कोटी रुपये खर्च केल्यानंतर ५ दिवसांपूर्वी तो पुन्हा लोकांसाठी उघडण्यात आला होता. त्यानंतर केवळ ४ दिवसांत १२ सहस्र लोकांनी या पुलावर येऊन पर्यटनाचा लाभ घेतला होता. नूतनीकरणामध्ये या पुलाच्या १४३ वर्षे जुन्या लोखंडी तारा (वायर) पालटण्यात आल्या नव्हत्या, तर केवळ ‘फ्लोरिंग’मध्ये पालट करण्यात आला होता. नूतनीकरणाच्या नंतर प्राथमिक माहितीनुसार पूल उघडण्यापूर्वी संबंधित सरकारी यंत्रणेकडून आस्थापनाला तिचे काम नीट झाले आहे का ? तो वापरण्यास योग्य झाला आहे का ? याची तपासणी करून प्रमाणपत्र घेण्यात आले नसल्याचेही सांगण्यात येत आहे. मोरबी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी याविषयी आता हात वर केले आहेत. म्हणजे ‘यामागे भ्रष्टाचार झाला आहे का ?’, असाच प्रश्न उपस्थित होतो. त्याचप्रमाणे या पुलावरून एकाच वेळी १०० हून अधिक जणांना जाण्याची अनुमती नसतांना अपघाताच्या वेळी ५०० हून अधिक लोक या पुलावर उपस्थित होते. हा पूल म्हणजे एक पर्यटन केंद्र होते. त्यामुळे या पुलाचा वापर करण्यासाठी १७ रुपयांचे तिकीट घ्यावे लागते. १०० हून अधिक तिकिटे विकली गेल्यानंतरही त्यावरून जाण्यासाठी मोठी गर्दी असल्याचे लक्षात येऊनही तिकीट विकणार्‍यांनी तिकिटे विकली आणि लोकांना पुलावरून जाऊ दिले. म्हणजे पुलाच्या क्षमतेपेक्षा अधिक लोक चढल्यामुळे त्यावर ताण आला असणार, यात शंका नाही. इतकेच नव्हे, तर जे लोक पुलावर गेले होते, ते पूल जाणीवपूर्वक हालवत होते. पर्यटक भ्रमणभाषद्वारे छायाचित्रे काढत होते, चित्रीकरण करत होते. पुलाच्या केबलला लाथा मारत होते, असे सामाजिक माध्यमांतून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे या घटनेला पुलावरील उपस्थित काही टवाळखोर, तसेच प्रमाणापेक्षा अधिक लोकांना पुलावर जाऊ देणारे हे उत्तरदायी असल्याचे प्राथामिकदृष्ट्या तरी दिसत आहे. आता सरकारकडून चौकशी करण्यात येईल, त्यात पूल पडण्यामागील कारणे अधिक स्पष्ट होतील.

या घटनेवरून आता राजकारणही होईल. गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला यासाठी उत्तरदायी ठरवेल. सत्ताधारी पक्षाने या पुलाच्या देखभालीचे कंत्राट ज्या आस्थापनाला दिले होते, त्या आस्थापनावर गुन्हा नोंदवला आहे. या घटनेच्या चौकशीसाठी या प्रकरणी ९ जणांना अटकही करण्यात आली आहे. काही दिवसांनी लोक ही घटना विसरून जातील. याला उत्तरदायी कोण होते ? हे पोलिसांच्या चौकशीत, तसेच चौकशी समितीच्या अहवालातून काही मासांनी किंवा काही वर्षांनी कधीतरी समोर येईल, तेव्हा त्याचे गांभीर्य किती असेल ? हे तेव्हाच सांगता येईल. त्यातही जर कुणी दोषी असतील, तर किती जणांना शिक्षा होईल ? आणि त्या शिक्षेचे प्रमाण किती कठोर असेल ? हे आता सांगता येणार नाही. देशात प्रत्येक घटनेच्या वेळी असेच होते. ‘मोठ्या अपघातांमागील उत्तरदायींना शिक्षा होते’, असे कुणीही ठामपणे म्हणू शकत नाही. भारतियांची संवेदनशीलता काही घंटे किंवा काही दिवसांचीच असते. या घटनेविषयीही वेगळे काही होईल, असे म्हणणे धाडसाचेच ठरेल !

भारतात मोठ्या अपघातांमागील गुन्हेगारांना कधी शिक्षा होते का ? आणि उपाययोजना काढली जाते का ?