करीमनगर (तेलंगाणा) येथील ‘जमात-ए-इस्लामी हिंद’च्या कार्यक्रमाला पोलिसांनी अनुमती नाकारली !

  • मुसलमानेतर तरुणींना दुपारच्या जेवणासाठी केले होते आमंत्रित !

  • विश्‍व हिंदु परिषदेने केला होता विरोध !

करीमनगर (तेलंगाणा) – येथील काश्मीर गड्डाजवळील शालिमार फंक्शन हॉलमध्ये ३० ऑक्टोबर या दिवशी पोलिसांनी ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ला मुसलमानेतर तरुणी आणि महिला यांचा भव्य मेळावा आयोजित करण्याची अनुमती नाकारल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.

१. जमात-ए-इस्लामी हिंद या सामाजिक आणि धार्मिक संघटनेच्या महिला शाखेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात मुसलमानेतर तरुणी आणि महिला यांना दुपारचे जेवण देण्यात येणार होते; मात्र विश्‍व हिंदु परिषदेने करीमनगर पोलीस आयुक्तांकडे ‘या कार्यक्रमाला अनुमती देऊ नये’, अशी विनंती केली होती. ‘जर हा कार्यकम झाला, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणीही विहिंपने दिली होती.

२. जमात-ए-इस्लामी हिंद ही संघटनांना हिंदु तरुणींना लव्ह जिहादमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विहिंपच्या गोरक्षा शाखेचे अध्यक्ष वुतुकुरु राधाकृष्ण रेड्डी यांनी केला. त्यामुळे येथे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.

३. रेड्डी म्हणाले की, या कार्यक्रमामुळे हिंदूंच्या स्वाभिमानाला धक्का बसला आहे. जमात-ए-इस्लामी हिंदच्या सदस्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, तसेच हिंदु तरुणींनी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहू नये.