देशात निकोप स्पर्धा असल्याने प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले ! – शायना एन्.सी., प्रवक्त्या, भाजप

डावीकडून श्री. गिरीश चितळे, शायना एन्.सी. आणि श्री. राहुल चिकोडे

कोल्हापूर, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘मेन इन इंडिया’ अंतर्गत देशाची प्रगती चालू आहे. आपण जेव्हा एखाद्या उद्योगपतीच्या दृष्टीने विचार करतो, तेव्हा त्याला जी परिस्थिती योग्य वाटेल, त्यानुसार तो निर्णय घेतो. संपूर्ण देशपातळीवर विचार केल्यास हा प्रकल्प देशाबाहेर गेला नसून केवळ दुसर्‍या राज्यात गेला आहे. देशात निकोप स्पर्धा असल्याने प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले, असे प्रतिपादन ‘जायट्ंस वेल्फेअर फाऊंडेशन’च्या विश्वअध्यक्षा, तसेच भाजपच्या प्रवक्त्या शायना एन्.सी. यांनी केले. त्या कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या प्रसंगी ‘जायट्ंस वेल्फेअर फाऊंडेशन’चे अध्यक्ष श्री. गिरीश चितळे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. राहुल चिकोडे उपस्थित होते.

१. निवडणुका जवळ येतात, तेव्हाच ‘आप’चे अरविंद केजरीवाल यांना हिंदु देवतांची आठवण येते. त्यामुळेच ते नोटांवर देवतांची चित्रे असायला हवीत, अशी मागणी करत आहेत. केजरीवाल कायमच ‘मतपेटी’चे राजकारण करतात. नोटांवर कुणाचे चित्र असावे, ही एक घटनात्मक प्रक्रिया आहे आणि त्यानुसार निर्णय होतो. नोटांवर कुणाचे चित्र असावे आणि नसावे, हे जनता ठरवेल.

२. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी काढत असलेल्या यात्रेला ‘भारत जोडो’ यात्रा ही एक दिशाहीन यात्रा आहे. ना काँग्रेस पक्षासमोर कोणतेही ध्येयधोरणे आहेत, ना काँग्रेस पक्ष एक सक्षम विरोधी पक्ष आहे. काँग्रेसला काहीही भविष्य नाही, तसेच काँग्रेस आता प्रादेशिक पक्ष म्हणून शिल्लक राहिला आहे.

३. ‘जायट्ंस वेल्फेअर फाऊंडेशन’ ही पूर्णपणे स्वदेशी कार्य करणारी संस्था असून समाजातील अगदी तळागाळातील लोकांसाठी आम्ही काम करतो. आम्ही ‘समाजाचे सेवक आहोत’, या भावनेतून काम करतो. वर्ष १९९९ मध्ये मी कोल्हापूर येथे आले होते. त्यानंतर आता कोल्हापूर येथे पुष्कळ प्रगती झाली आहे. वंचित मुलांसाठी चालवण्यात येणार्‍या बालवाडीला मी भेट दिली.