मुले आई-वडिलांचा सांभाळ करत नसतील, तर संपत्ती परत मिळवता येते !

दिवाणी न्यायाधीश एस्.पी. पाटील यांची माहिती

सोलापूर – मुले आई-वडिलांचा सांभाळ करत नसतील, तर त्यांना दिलेली संपत्ती ज्येष्ठांना परत मिळवता येते, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश एस्.पी. पाटील यांनी दिली. सोरेगांव येथील ‘ब्रिजधाम’ वृद्धाश्रमात आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. न्यायाधीश पाटील यांनी मृत्यूपत्र कशाप्रकारे सिद्ध करावे ? याविषयीही ज्येष्ठ नागरिकांना माहिती दिली. या वेळी सोलापूर येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) ए.ओ. जैन यांनीही ज्येष्ठ नागरिकांना कायद्याविषयी मार्गदर्शन केले.

ए.ओ. जैन म्हणाले, ‘‘हा कायदा वर्ष २००७ मध्ये लागू करण्यात आला आहे. स्वत:ची संपत्ती मुलांच्या नावे करूनही मुले वृद्धांचा सांभाळ करू शकत नसतील, तर ही संपत्ती परत मिळवता येते. त्यासाठी प्रांत कार्यालयात जाऊन नियमानुसार अर्ज करावा लागेल. त्यानंतर मुलांसाठी दिलेले संपत्ती बक्षीसपत्र आपोआप रहित होईल.’’ कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात ‘ब्रिजधाम’ वृद्धाश्रमाचे संस्थापक आणि समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांनी मनोगत व्यक्त केले.