आज प.पू. काणे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील प.पू. काणे महाराज यांनी नामस्मरणाचे महत्त्व मनावर बिंबवण्यासाठी नामस्मरणाची वर्णन केलेली महती !

‘वर्ष १९९३ ते वर्ष २००१ पर्यंत मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने प.पू. काणे महाराज यांचा सत्संग लाभला. त्या कालावधीत प.पू. काणे महाराज यांनी मला अध्यात्मशास्त्र, साधना, सेवा, अहंनिर्मूलन, गीताप्रेसच्या ग्रंथाद्वारे अध्यात्मप्रसार, हिंदुत्व, राष्ट्राभिमान इत्यादींविषयी कृतीशील ज्ञान दिले. मी प.पू. काणे महाराज यांच्या सत्संगात असतांना त्यांनी ‘नामजपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे’, हे माझ्या मनावर बिंबवले. तेव्हा त्यांनी नामजपाविषयी सांगितलेले अनमोल ज्ञान पुढे दिले आहे.

प.पू. काणे महाराज

१. नामस्मरणाचे महत्त्व जाणून ते इतरांच्या मनावर बिंबवणारे प.पू. काणे महाराज !

१ अ. प.पू. काणे महाराज यांनी सतत नामस्मरण करणे : प.पू. काणे महाराज नामस्मरणाचे महत्त्व माझ्या अंतर्मनावर बिंबण्यासाठी मला सतत संतांची शिकवण आणि त्यांना आलेल्या अनुभूती यांचा संदर्भ सांगत असत. मी त्यांच्या समवेत असतांना ते माझ्याकडून सतत नामस्मरण करून घेत असत. त्यांच्या सत्संगामध्ये माझे नामस्मरण एकाग्रतेने होऊन मला आनंद मिळत असे. ते पहाटे ३.३० वाजता उठून नामजप करत आणि दिवसभरही त्यांच्या रहात्या खोलीत नामस्मरण करत असत. मलाही पहाटे ४ वाजता जाग येत असल्यामुळे मीही त्यांच्या समवेत नामस्मरण करत असे.

पू.शिवाजी वटकर

१ आ. नामस्मरणाचा प्रसार करणे : ते संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची शिकवण आणि गीताप्रेसचे ग्रंथ यांच्या साहाय्याने नामस्मरणाचा प्रसार करायचे. त्यांना कुणी भेटले, तर ते त्यांना नामस्मरण करायला सांगत आणि ग्रंथ अन् ऋषिमुनी यांच्या उदाहरणांतून नामस्मरणाचे महत्त्व पटवून देत असत. ते १ – २ पानांची पत्रके सिद्ध करून त्याच्या प्रती (झेरॉक्स) काढून अनेक जिज्ञासूंना विनामूल्य देत असत.

२. नामसाधन अत्यंत सोपे आणि सहज साधन असून कोणतेही शारीरिक कार्य चालू असतांनाही नामस्मरण करू शकणे

नामसाधन हे अत्यंत सोपे साधन आहे. इतर योगयागादी साधना करतांना शरिराला कष्ट पडतात, तसे नामस्मरण करतांना कुठलेही कष्ट होत नाहीत. नुसते वाणीने ‘नामोच्चारण’ केले की, पुरे ! नामस्मरण करण्यासाठी वेगळा वेळ काढायला नको. आपण कोणतेही लौकिक व्यवहार करतांनाही नामस्मरण करू शकतो. आपण संसारासाठी रात्रंदिवस पुष्कळ कष्ट करतो, तसे नामस्मरणासाठी केले, तर सर्वच साधते.

३. नामाचे अलौकिक गुण आणि सर्वसमर्थता !

३ अ. सर्वसमर्थ असलेले भगवंताचे नाम ! : भगवंताची सर्वज्ञता, सर्वशक्तीमानता, दयासिंधुत्व इत्यादी जे अलौकिक गुण आहेत, ते त्याच्या नामात आहेत. ‘जो दुसर्‍याच्या साहाय्यावाचून एकटाच सर्व प्राप्त करून देऊ शकतो आणि ज्याच्या साहाय्यावाचून दुसरे कुणी काहीच करू शकत नाहीत, त्याला ‘समर्थ’, असे म्हणतात. ‘नाम’ हे असे सर्वसमर्थ आहे.

३ आ. अनंत कोटी पापे जाळण्याचे सामर्थ्य असलेले नाम ! : सगुण परमेश्वराला ध्यानात जसे माया निरसन करून मुक्त करण्याचे सामर्थ्य आहे, म्हणजे भक्ताने परमेश्वराचे ध्यान केले, तर त्याला मायेतून मुक्त करण्याचे सामर्थ्य परमेश्वरामध्ये आहे, त्याप्रमाणे परमेश्वराच्या नामातही अनंत कोटी पापे जाळण्याचे सामर्थ्य आहे. एवढे नाम अगाध प्रायश्चित्तरूप आहे. ‘नामाने जळणार नाही’, असे पाप मनुष्य करूच शकत नाही’, अशी वचने आहेत.

४. नामस्मरणाने होणारे लाभ !

४ अ. नामस्मरणाने प्रारब्ध न्यून होणे : प.पू. काणे महाराज संत तुकाराम महाराज यांच्या पुढील श्लोकाचा संदर्भ देऊन नामाचे महत्त्व पटवून सांगतात.

आलिया भोगासी असावे सादर । देवावरी भार घालूनियां ।।१।।

मग तो कृपासिंधू निवारी साकडें । येर तें बापुडें काय रंक ।।२।।

भयाचिये पोटीं दु:खाचिया राशी । शरण देवासी जातां भले ।।३।।

तुका म्हणे नव्हे काय त्या करितां । चिंतावा तो आता विश्वंभर ।।४।।

– तुकाराम गाथा, अभंग १६३६

अर्थ : ‘मनुष्याच्या प्रारब्धानुसार जे जे त्याच्या वाट्यास येते, ते ते भोगण्यासाठी देवच कर्ता-करविता आहे’, हा भाव ठेवून सिद्ध असावे. हा भाव ठेवला की, कृपासिंधू असा ईश्वर संकटांचे निवारण करतो. अशा वेळी बाकी कुणीही गरीब बिचारेच ठरतात. मुळात दुःख भयापोटी निर्माण होते. ‘सर्वकाही देवाचे’, असा भाव ठेवला की, कशाचेही भय रहात नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘स्वतःचे कल्याण कशात आहे ?’, हे आपण न ठरवता ते सारे भगवंतावरच सोपवावे आणि आपण देवाचे चिंतन करावे.’

म्हणजे प्रारब्धानुसार सुख-दुःखाचे भोग न बोलावताही आपल्या आयुष्यात येणारच आहेत. त्यातून सुटका नाही. यासाठी सर्वांत सुखकर मार्ग म्हणजे देवावर पूर्ण भार घालून अशा भोगांना सामोरे जाणे. पूर्ण शरण आलेल्या भक्ताचे कोणतेही संकट कृपासिंधु ईश्वरच निवारण करू शकतो, बाकीचे कुणी काहीही करू शकत नाही.

४ आ. नाम कसेही घेतले, तरी पापांचा नाश होणे : ‘पापांचा नाश आणि भगवत्प्राप्ती’ ही नामाची मुख्य २ कार्ये आहेत. आपण एवढे पाप करूनही आपल्याला देवाचे नाम घेण्याचा अधिकार आहे. भाव असो वा नसो, कसेही नाम घेतले, तरी नामाने पापांचा नाश होतो; पण नामस्मरणाच्या समवेत भगवंताच्या रूपाचे ध्यान घडल्याविना भगवत्प्राप्ती होत नाही. असे असले, तरी निराश होण्याचे कारण नाही. हे सर्व कार्यही क्रमाक्रमाने नामस्मरणानेच होऊ शकते.

४ इ. भगवंताच्या नामाच्या समवेत त्याच्या सगुण रूपाचे ध्यान अखंड केल्यास मनुष्याला एकाच जन्मात भगवंताची प्राप्ती होणे शक्य असणे : मनुष्याला एकाच जन्मात नामस्मरणाने भगवत्प्राप्ती करून घ्यायची असल्यास इंद्रिये, मन आणि बुद्धी यांचे पूर्ण नियमन करून कोणतेही पाप होऊ न देता, नामाचे कोणतेही अपराध होऊ न देता, अविरत अन् अविश्रांत नामस्मरण करतांना भगवंताच्या सगुण रूपाचे ध्यान घडले पाहिजे. मनात किंचित् जरी सकाम भाव असेल, तरी तोपर्यंत नामापराध होणारच. असे असले तरी, नामस्मरण निष्ठेने तसेच चालू ठेवले, तर मनात निष्काम भाव निर्माण होतो आणि त्यामुळे नामाचे प्रेम निर्माण होऊन भगवंताची प्राप्ती होते.

४ ई. नामाने गोपीभाव निर्माण होणे : यात गंमत अशी आहे की, हे करतांना जसजसे भगवंताच्या वियोगाचे दुःख होते, तसतसे पाप संपत जाते आणि भगवंताच्या दर्शनामुळे होणार्‍या अपार आनंदाने सर्व पुण्य संपते. त्यामुळे खराखुरा गोपीभाव प्राप्त होऊन तो खरा भक्त होतो आणि दुसर्‍यांचाही उद्धार करतो.

४ उ. नामस्मरणाने शारीरिकदृष्ट्याही लाभ होणे : शारीरिक त्रासावर ‘नामस्मरण’ हा उपाय आहे. एक जण प.पू. काणे महाराज यांना म्हणाला, ‘‘मला पुष्कळ शारीरिक त्रास होतात.’’ तेव्हा प.पू. काणे महाराज यांनी त्याला सांगितले, ‘‘नामस्मरणातच सर्व रोगांवर उपचार आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत नामस्मरण करत रहा.’’

५. नामसाधना एवढी सोपी असूनही विषयांच्या आसक्तीमुळे नाम होऊ न शकणे

नामस्मरण ही सत्ययुगीन साधना आहे. त्यामुळे मन सात्त्विक झाल्याविना ते नाम घेऊ शकत नाही. शब्द हा आकाशाचा गुण आहे. नामसाधना ही मानसिक साधना आहे. मन जोपर्यंत जड पदार्थांना, म्हणजे विषयांना चिकटले आहे, तोपर्यंत ते नाम घेऊ शकत नाही. आकाश ज्याप्रमाणे कशालाही चिकटलेले नाही, तसे मन कशालाही चिकटू नये. तेव्हाच ते (मन) आकाशाचा गुण असलेला शब्द (नाद) ग्रहण करू शकते. वेदांत ब्रह्माला ‘ख ब्रह्म’, अशी उपमा दिली आहे. व्यापक पदार्थांत अधिकाधिक व्यापक असे आकाशच आहे. आकाशासारखे अलिप्त होण्यासाठीच स्वधर्माचरण आहे. सर्व योगांत मोठा योग ‘नामयोग’ आहे. यासाठीच संतांनी नामयोग साधून भगवत्प्राप्ती करून घेतली. ‘भक्त व्हावे’, असे सर्वांनाच वाटत असते; पण होतो एखादाच !

६. नामस्मरण हाच विश्वधर्म !  

आधी होता संतसंग । तुका झाला पांडुरंग ।

त्याचें भजन राहिना । मूळ स्वभाव जाईना ।।

अर्थ : पूर्वी अन्य संतांच्या संगतीत असतांना तुकाराम महाराज भजने गात असत. पुढे ते पांडुरंगाशी पूर्णपणे एकरूप झाले. तरीही त्यांचे भजन करणे चालूच होते. मूळ स्वभाव काही जाईना.

नामस्मरण हा मनुष्याचा मूळ स्वभाव आहे. त्यालाच ‘भजन’ असेही म्हणतात. त्या मूळ स्वभावापासून दूर गेल्यामुळेच आपण हिंदू दुःखी झालो आहोत. त्यामुळे मनुष्य सत्ययुगातून त्रेतायुगात, त्यातून द्वापरयुगात, असे होत होत आता कलियुगात आला आहे. बाहेर कलियुग असले, तरी आपण मनाने सत्ययुगात गेल्याविना नाम घेऊ शकत नाही. सध्याचा काळ धर्माचरणाला अत्यंत प्रतिकूल झाल्यामुळे वेदांप्रमाणे आचरण करण्याचाही लोकांना तेवढा अधिकार राहिला नाही. ‘यमनियम (अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अस्तेय (चोरी न करणे) आणि अपरिग्रह (कोणत्याही वस्तूंचा संग्रह न करणे), म्हणजेच आत्मसंयमनासाठी करायच्या कृती) पाळून केलेले नामस्मरण हाच आता ‘विश्वधर्म’ आहे’, असे म्हणता येईल.’

संग्राहक : (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.३.२०१८)