१. स्वकौतुकाचे विचार मनात आल्यावर ‘देव प्रत्येक जिवाला भरभरून देत असणे आणि स्वतःतील अहंकारामुळे ते दिसत नसणे’, याची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने जाणीव होणे
१ अ. स्वकौतुकाचे विचार मनात आल्यावर ‘ते अहंचे विचार आहेत’, याची जाणीव होणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी क्षमायाचना होणे : ‘४.२.२०२२ या दिवशी माझ्या मनात ‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सगुण सेवा केली आहे. मला गुरुदेवांनी स्वतः शिकवले आहे’, असे स्वकौतुकाचे विचार आले. त्या वेळी मला त्या अहंच्या विचाराची जाणीव झाल्यावर मी गुरुदेवांच्या चरणी क्षमायाचना केली.
मी त्यांना प्रार्थना करून सूक्ष्मातून एक प्रश्न विचारला, ‘हे गुरुदेवा, माझ्या मनातील हे स्वकौतुकाचे विचार दूर होण्यासाठी मी काय दृष्टीकोन ठेवू ?’ मला तुमच्या स्थूल रूपाचे दर्शन झाले आहे. ‘तुमच्या कृपेमुळेच मला दैवी बालकांचा सत्संग घेण्याची सेवा मिळाली आहे’, त्याबद्दल माझ्या मनात अखंड कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव जागृत असू दे.’
१ आ. ‘देव प्रत्येक जिवाला किती देत आहे !’, हे व्यापकत्व आल्यावर दिसेल’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून सांगणे आणि ‘देव प्रत्येक जिवाला भरभरून देत असतो’, याची जाणीव होणे : त्या वेळी नारायणस्वरूप गुरुदेवांनी मला सूक्ष्मातून उत्तर दिले, ‘जशी देवाने तुला गुरूंची सेवा करण्याची संधी दिली, त्याचप्रमाणे देव जगभरातील प्रत्येक साधकाला त्याच्या टप्प्यानुसार भरभरून देत आहे. आपल्याला केवळ ‘आपल्याला काय दिले ’, एवढेच दिसते; कारण आपल्यात अजून तेवढे व्यापकत्व नाही. ज्या वेळी आपल्यातील व्यापकत्व वाढते, त्या वेळी आपल्याला आपोआपच ‘देव प्रत्येक जिवाला किती देत आहे !’, हे दिसेल.
तेव्हा मला जाणीव झाली, ‘देव मला एकटीलाच सर्वकाही देत नाही. तो प्रत्येक जिवाला भरभरून देत असतो. केवळ आपल्यातील अहंकारामुळे आपल्याला ते दिसत नसते.’
त्या वेळी माझी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली आणि मला गुरुदेवांची पुष्कळ आठवण येऊ लागली.
२. गुरुकृपेने शिष्याची प्रगती होणे
२ अ. शिष्याकडून साधनेचे प्रयत्न अल्प झाले, तरीही गुरु त्याची प्रशंसा करून त्याचा उद्धार करत असणे : ४.२.२०२२ या दिवशी माझ्या मनात विचार आले, ‘परात्पर गुरुदेव माझे किती कौतुक करतात ! ते आम्हाला असेही म्हणतात, ‘‘तुमच्या वाणीत किती चैतन्य आहे ! तुम्ही भावपूर्ण सेवा करता.’’ त्या वेळी मला वाटले, ‘मी साधना करण्यात अल्प पडूनही गुरुदेव असे म्हणतात. हे कसे शक्य आहे ?’
मी हा विचार करत असतांना गुरुदेवांनी मला सूक्ष्मातून उत्तर दिले, ‘ज्या वेळी गुरु शिष्याची प्रशंसा करतात, त्या वेळी शिष्याचा उद्धार होतो. गुरुच शिष्याला पुढची साधना आणि सेवा करण्यासाठी बळ प्रदान करतात. शिष्य करत असलेले अल्प प्रयत्नही गुरूंपर्यंत पोचतात आणि गुरु प्रसन्न होतात. शिष्याने गुरुदेवांचे स्मरण अखंड केले आणि त्यांनी सांगितलेली साधना केली, तर आपोआपच शिष्याची प्रगती होऊ लागते.’
२ आ. गुरुदेवांनी दिलेल्या बळामुळेच शिष्याकडून साधना होत असणे : ‘आपल्या वाणीत चैतन्य येते किंवा आपण भावपूर्ण सेवा करतो’, ही केवळ आणि केवळ गुरुदेवांचीच कृपा असते. आपण त्यांनी दिलेल्या बळामुळेच साधना करू शकतो’, असे वाटून माझी गुरुचरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. ‘गुरुदेवच आपल्या प्रगतीमागचे खरे आशीर्वादस्वरूप कारण आहेत’, असे मला जाणवले.
३. कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, या अज्ञानी जिवाच्या मनात किती प्रश्न आणि विचार येत असतात ! तुम्हीच ते दूर करून मला तुमच्या चरणी घ्या. आपण मला हे अनमोल बोधामृत प्रदान केल्याबद्दल मी आपल्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा. (५.२.२०२२)
|