देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील एक अनमोल सद्गुरुरत्न सद्गुरु राजेंद्र शिंदे !

‘आजतागायत बर्‍याच साधकांनी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याविषयी बरेच लिखाण केले आहे. सद्गुरु दादांच्या ठायी असलेल्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात विविध लेख आणि अनेक कविता प्रकाशित झाल्या आहेत, तसेच सद्गुरु राजेंद्रदादांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुमाऊली) यांच्याविषयी लिहिलेले लेख सुंदर असतात.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

१. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यामध्ये अनेक दैवी गुण असणे 

सद्गुरु राजेंद्रदादा चैतन्यमय आणि तेजःपुंज आहेत. त्यांच्या मुखावर नेहमी हास्य झळकत असते. सद्गुरु दादांच्या ठायी ‘उत्तम निरीक्षणक्षमता, आबालवृद्धांची प्रेमाने विचारपूस करणे, सर्वांशी जवळीक साधणे, आश्रमातील साहित्य-साधने यांचे निरीक्षण करणे आणि ते अयोग्य पद्धतीने ठेवले असल्यास स्वतः व्यवस्थित करणे, साधकांच्या साधनेविषयीच्या अडचणींवर उपाय सुचवणे, नवीन साधकांशी स्वतःहून ओळख करून घेणे’ इत्यादी गुण आहेत. त्यांचा साधकांच्या प्रती असलेला वात्सल्यभाव पाहून साधकांना ‘ते आपलेच आहेत’, असे वाटते. साधक संकोच न बाळगता सद्गुरु दादांशी मनमोकळेपणाने बोलतात.

२. ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे प्रतिरूप आहेत’, असे वाटणे 

सद्गुरु राजेंद्रदादांच्या संदर्भात प्रकाशित झालेल्या लिखाणातून ‘सद्गुरु राजेंद्रदादा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे प्रतिरूप आहेत’, असे वाटते. सद्गुरु दादांचे प्रेमभावाने बोलणे, आपुलकीने विचारपूस करणे, त्यांच्या नेत्रांतून दिसून येणारी प्रीती पाहून साधक अगत्याने त्यांचे बोल आनंदाने ऐकत असतात. असाच अनुभव बाहेरून देवद आश्रमात येणारे साधक, पाहुणे आणि जिज्ञासू यांना सद्गुरु दादांच्या संदर्भात येत असतो.

श्री. कृष्णकुमार जामदार

३. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या माध्यमातून समवेत आहेत’, असे प्रत्ययाला येणे 

मी प्रतिदिन सकाळी ध्यानमंदिरात सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जातो. त्यानंतर मी बाहेरच्या बाजूला ठेवलेल्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या छायाचित्राचे दर्शन घेत असतो. एकदा मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या छायाचित्राकडे पहात असतांना मला त्यांच्या चेहर्‍याच्या ठिकाणी सद्गुरु दादांचे सुहास्यवदन दिसले. ते पहाताच मला अतोनात आनंद झाला. मला कृतकृत्य झाल्याप्रमाणे वाटले. ‘सद्गुरु राजेंद्रदादांच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली आपल्या समवेत आहेत’, असे प्रत्ययाला येते.

४. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे दर्शन झाल्यावर येत असलेल्या अनुभूती 

अ. मला प्रतिदिन सकाळी सद्गुरु राजेंद्रदादांचे दर्शन होते. तेव्हा मला एक विलक्षण ऊर्जा आणि चैतन्य मिळाल्याचे अनुभवायला येते.

आ. मला सेवा आणि साधना करायला उत्साह जाणवतो. माझा आत्मविश्वास वृद्धींगत होतो.

५. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना ‘दादा’ ही उपाधी सार्थ ठरत असणे 

‘दादा’ या शब्दातील पहिले ‘दा’ हे अक्षर ‘दायित्व घेणे’, असे सूचित करते आणि दुसरे ‘दा’ हे अक्षर ‘दान (ज्ञानदान) करणे’, असे सूचित करते’, असे मला वाटते. ‘दादा’ ही उपाधी सद्गुरु राजेंद्रदादांच्या संदर्भात सार्थ आहे’, असे मला वाटते.

६. प्रार्थना आणि कृतज्ञता 

‘आमच्या मनात सद्गुरु राजेंद्रदादांबद्दल असाच उत्कट भाव राहून त्यांच्या सान्निध्यात आमची प्रगती होवो’, अशी मी सच्चिदानंद परब्रह्म माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. ‘सद्गुरूंचे प्रेमळ सान्निध्य आणि शिकवण अन् सच्चिदानंद परब्रह्म माऊलींची कृपा’ यांमुळे हे लिखाण करण्याची प्रेरणा मला मिळाली. माझ्याकडून ही सूत्रे लिहून घेतल्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. कृष्णकुमार जामदार (वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.११.२०२४)