‘श्री. सीताराम (नाना) आग्रे (वय ६९ वर्षे) यांनी सनातनचे विविध आश्रम आणि सेवाकेंद्र यांमध्ये बांधकामाच्या संबंधित सेवा केल्या. आता ते रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधनारत आहेत. ‘ते करत असलेली प्रार्थना आणि गुरुकृपा’ यांमुळे त्यांना सेवेत आलेल्या अडचणींवर मात करता आली. त्यांना झालेल्या शारीरिक त्रासांत आणि मुलाच्या निधनाच्या प्रसंगात त्यांनी गुरुकृपा अनुभवली. त्या संदर्भात त्यांनी लिहिलेली कृतज्ञतापर सूत्रे ७ जानेवारी या दिवशी पाहिली. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/871134.html
४. रामनाथी आश्रमात सेवा करण्यासाठी पुन्हा येणे
४ अ. शारीरिक त्रास होत असतांना गुरुदेवांची कृपा अनुभवणे
३. एकदा मला गुरुदेवांचा सत्संग लाभला. त्यांनी माझी विचारपूस केली. त्यांनी मला औषधोपचार आणि नामजपादी उपाय करायला सांगितले. मला होणार्या वेदना त्यांच्या कृपेनेच ५० टक्के इतक्या प्रमाणात न्यून झाल्या.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितल्यानुसार भाववृद्धी सत्संगाला जाणे आणि गुरुदेवांच्या कृपेने भावजागृतीचे प्रयत्न करणे : नंतर एका सत्संगात माझी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी भेट झाली. त्यांनी मला आश्रमात होत असलेल्या भाववृद्धी सत्संगाला जायला सांगितले. मी भावसत्संगाला जायला लागलो. गुरुदेवांनी माझ्याकडून भाववृद्धी सत्संगात सांगितल्याप्रमाणे भावजागृतीचे प्रयत्न करून घेतले.
५. या कालावधीत एका वैद्यांकडून माझ्यावर वैद्यकीय उपचार चालू झाले. नंतर मला हळूहळू बरे वाटायला लागले.
६. गुरुदेवांच्या कृपेने आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित होणे
नोव्हेंबर २०१८ मध्ये एका सत्संगात ‘माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे’, असे घोषित करण्यात आले. मला असह्य वेदना होत असतांनाही गुरुदेवांनी माझ्याकडून साधनेचे प्रयत्न करून घेतले. त्या वेळी माझी श्री गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
७. गुरुदेवांच्या कृपेने जमेल तेवढी सेवा आणि समष्टीसाठी नामजप करणे
‘माझ्याकडून पूर्वीसारखी सेवा होत नाही’, याची मला खंत वाटत होती. तेव्हा गुरुदेवांनी मला सांगितले, ‘‘खंत वाटून घेऊ नका. समष्टीसाठी नामजप करा.’ नंतर माझा पाय बरा झाला. तेव्हापासून मी जमेल तेवढी सेवा आणि समष्टीसाठी नामजप करत आहे. त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !
८. मुलाच्या निधनाच्या प्रसंगी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भ्रमणभाष करून धीर देणे आणि गुरुदेवांच्या कृपेने साधनारत राहू शकणे
नोव्हेंबर २०२१ मध्ये माझा मुलगा संतोष याला कोरोनाची लागण झाली. औषधोपचार चालू होते; परंतु त्यात यश आले नाही. त्या साथीत त्याचे निधन झाले. आमच्यावर मोठे संकट आले. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला भ्रमणभाष करून धीर दिला. त्या मला म्हणाल्या,‘‘त्याच्या प्रारब्धानुसार झाले. गुरुदेव त्याची काळजी घेणार आहेत. तुम्ही काळजी करू नका.’’ ‘अशा प्रसंगातही गुरुदेवांच्या कृपेमुळेच आम्ही साधनारत राहू शकलो’, त्याबद्दल माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
‘श्री गुरुदेवच माझ्याकडून साधना आणि सेवा करून घेत आहेत. ‘मला त्यांच्या चरणी स्थिर रहाता येऊ दे’, अशी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– श्री. सीताराम (नाना) आग्रे (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६० टक्के ), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.४.२०२४) (समाप्त)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |