‘अ‍ॅमेझॉन’ हिंदूंच्या धर्मांतरासाठी पैसे पुरवत असल्याचा आरोप !

स्वयंसेवी संस्थेने केलेल्या तक्रारीनंतर राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने बजावली नोटीस !

नवी देहली – जगप्रसिद्ध ‘ऑनलाईन शॉपिंग’ आस्थापन अ‍ॅमेझॉनने आजपर्यंत अनेक वेळा हिंदूंच्या देवतांचे विडंबन केले आहे. आता हे आस्थापन हिंदु मुला-मुलींचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करणार्‍या ‘ऑल इंडिया मिशन’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेला पैसा पुरवत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने अ‍ॅमेझॉनला नोटीस पाठवून १ नोव्हेंबरपर्यंत त्यांचे भारतातील प्रमुख अमित अग्रवाल यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.

१. ‘ऑल इंडिया मिशन’ ही संस्था भारतातील मुला-मुलींचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करत असते. या प्रकरणी अरुणाचल प्रदेशातील स्वयंसेवी संस्था ‘सोशल जस्टिस फोरम’कडून तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची नोंद घेत राष्ट्रीय बाल हक्क संस्थेने सप्टेंबरमध्ये ‘अ‍ॅमेझॉन’ला नोटीस बजावली होती.

२. या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, ‘ऑल इंडिया मिशन’चे संपूर्ण भारतात १०० हून अधिक अनाथाश्रम आहेत. या संस्थेचे संकेतस्थळ आणि सामाजिक माध्यमांचे अधिकृत पृष्ठ यांवर ‘भारतातील लोकांचे धर्मांतर करण्याचे उद्दिष्ट आहे आणि त्यांनी भारतातील विशेषत: ईशान्य भारत आणि झारखंड येथे आधीच अनेक लोकांचे धर्मांतर केले आहे’, असा दावाही केला आहे. या संस्थेला ‘अ‍ॅमेझॉन इंडिया’कडून निधी मिळत आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंकडून मिळत असलेला पैसा त्यांच्या विरोधात वापरणे हे अस्वीकारार्ह आहे ! आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास केंद्रशासनाने अ‍ॅमेझॉनवर भारतामध्ये कोणत्याही स्वरूपात व्यापार करण्यावर बंदी लादली पाहिजे !
  • जे एका स्वयंसेवी संस्थेला कळते, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाला कसे लक्षात येत नाही ?