‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी सांगितले आहे, ‘वर्ष २०२२ च्या विजयादशमीनंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील अष्टविनायक (मोरगाव येथील मयुरेश्वर, थेऊर येथील ‘चिन्तामणि’, सिद्धटेक येथील सिद्धिविनायक, रांजणगाव येथील महागणपति, ओझर येथील विघ्नेश्वर, लेण्याद्री येथील गिरिजात्मज, महड येथील वरदविनायक आणि पाली येथील बल्लाळेश्वर) यांचे दर्शन घ्यावे. या दौर्याच्या वेळी गणपतीशी संबंधित अन्य काही प्रमुख गणपति मंदिरांतही जाऊन मूर्तीचे दर्शन घ्यावे आणि ‘साधकांची प्राणशक्ती वाढावी, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी गणपतीला प्रार्थना करावी.’
सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी १४.१०.२०२२ या दिवशी आधी पाली येथील बल्लाळेश्वर, नंतर महड येथील वरद विनायक आणि शेवटी ओझरचा विघ्नेश्वर यांचे दर्शन घेतले.
महड येथील वरदविनायक गणपतीचे स्थान आणि इतिहास !
१. स्थान
‘रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड (मढ) हे अष्टविनायकांपैकी एक स्वयंभू गणेशाचे स्थान आहे.
२. ‘केवळ शिव सोडून बाकी सर्वांना अजिंक्य ठरणारा असा पराक्रमी पुत्र तुम्हाला होईल आणि तोही माझा भक्त होईल’, असा वर गणेशाने गृत्समद ऋषींना देणे
महान गणेशभक्त गृत्समद ऋषींनी पुष्पकारण्यामध्ये दिवसाकाठी केवळ झाडाची वाळलेली पाने खाऊन एका पायावर उभे राहून गणेशाचे कठोर तप केले. एकूण पाच कल्प (पाच सहस्रो वर्षे) ही तपसाधना पूर्ण झाल्यावर त्यांच्यासमोर ऋद्धिसिद्धिसह श्री गणेश प्रकट झाले. गृत्समद ऋषींनी श्रद्धापूर्वक त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. त्या वेळी गणपतीने त्यांना पुढील सिद्ध महामंत्र दिला.
ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् । – ऋग्वेद, मण्डल २, सूक्त २३, ऋचा १
अर्थ : समुदायांचा प्रभु म्हणून तू गणपति ज्ञानीजनांत अत्यंत ज्ञानी आहेस; ज्यांची कीर्ती अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांच्यामध्येही तू श्रेष्ठ आहेस. तू राजाधिराज असून तुला आम्ही आदराने बोलावतो. हे स्तुतींच्या प्रभो ब्रह्मणस्पते, आमची हाक ऐकून आपल्या सर्व शक्तीसह त्वरेने ये आणि या आसनावर विराजमान हो.
असा हा सिद्ध महामंत्र सांगून गणेशाने त्याचे जनकत्व गृत्समद ऋषींना बहाल केले. वसिष्ठ, विश्वामित्र यांच्यासारख्या उच्च श्रेणीच्या ऋषींमध्ये त्यांची गणना केली. त्याप्रसंगी गणेशाने गृत्समद ऋषींना वर दिला, ‘केवळ शिव सोडून बाकी सर्वांना अजिंक्य ठरणारा असा पराक्रमी पुत्रलाभ तुम्हाला होईल आणि तोही माझा भक्त होईल.’ हा वर देऊन गणेश अदृश्य झाले.
३. पुष्पकारण्य स्थानावर गृत्समद ऋषिंनी गणेशाचे सुंदर मंदिर बांधून श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणे आणि भक्तांना वरदान देणारा म्हणून त्याला ‘वरदविनायक’ नाव पडणे
पुष्पकारण्य स्थानावर गृत्समद ऋषिंनी गणेशाचे सुंदर मंदिर बांधले. त्यात गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना केली. येथे गृत्समद ऋषींना वर मिळाला, तसेच भक्तांना वरदान देणारा म्हणून त्याला ‘वरदविनायक’ नाव पडले. पुढे गृत्समद ऋषींना पुत्ररत्नाचा लाभ झाला. तोच ‘त्रिपूर’ होय. वरदविनायकाच्या या पुण्यक्षेत्राला ‘पुष्पक क्षेत्र’ असेही म्हणतात. गृत्समद ऋषिंनी येथे कठोर तप केले आणि ‘मंत्रद्रष्टे’ झाले; म्हणून या क्षेत्राला ‘भद्रक’ असेही म्हणतात. सध्या ‘महड’ या नावाने हे गणपतिक्षेत्र परिचित झाले आहे.
४. नंदादीप अखंड तेवत असलेले महडचे वैशिष्ट्यपूर्ण श्री वरद विनायक मंदिर !
येथील मंदिर आणि मूर्ती पूर्वाभिमुख आहे. सभामंडप मोठा आहे. गाभार्यात ऋद्धिसिद्धीच्या दगडी कोरीव मूर्ती आहेत. मखरात श्री विनायकाची डाव्या सोंडेची मूर्ती एका दगडी महिरपी सिंहासनावर आरूढ आहे. महडच्या श्री वरद विनायक मंदिराचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात एक नंदादीप अखंड तेवत आहे.
५. विनायकाची सेवा केल्यास भक्ताला दर्शन मिळते आणि त्याची मनोकामना पूर्ण होतेच. ‘माघी चतुर्थीला प्रसादाचा नारळ घेतल्यास संतानप्राप्ती होते’, अशी भाविकांची श्रद्धा आहे.’
(संदर्भ : अष्टविनायक यात्रा – डॉ. बी.पी. वांगीकर)
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी महड येथील ‘वरदविनायक’ गणपतीचे दर्शन घेतल्यावर त्यांना आलेल्या अनुभूती
१. प्रवासात मिळालेला शुभसंकेत !
‘पालीच्या बल्लाळेश्वराकडून महडच्या वरद विनायकाच्या मंदिराकडे जातांना वाटेत आम्हाला शुभ संकेत देणार्या मुंगुसाचे दर्शन झाले.
२. महड येथील गणपति मंदिराच्या समोर पोचल्यावर ‘धो धो’ पाऊस चालू होणे आणि हा वरुणदेवाचा आशीर्वाद म्हणजे ‘एक दैवी प्रचीती आहे’, असे वाटणे
पाली येथून दुपारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ खोपोलीजवळ असलेल्या महडच्या वरदविनायक गणपतीच्या मंदिराकडे जायला निघाल्या. मार्गक्रमण करतांना आकाश स्वच्छ दिसत होते. जेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ महड गावातील गणपति मंदिराच्या समोर पोचल्या, तेव्हा ‘धो धो’ पाऊस चालू झाला. वरुणदेवाचा हा आशीर्वाद म्हणजे ‘एक दैवी प्रचीती आहे’, असे आम्हाला वाटले.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ गाभार्यात गेल्यावर त्यांनी डोळे भरून गणपतीचे दर्शन घेणे आणि पुजार्यांनी ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’साठी प्रार्थना करून आम्हाला प्रसादाचा नारळ देणे
वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ वरद विनायकाच्या गाभार्यात गेल्या, तेव्हा तेथे अन्य कोणी भक्त नव्हते. त्यांनी डोळे भरून (मनसोक्त) गणपतीचे दर्शन घेतले. पुजारी श्री. गौरव पोशे यांनी देवाला ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’साठी प्रार्थना करून आम्हाला प्रसादाचा नारळ दिला.
४. मंदिरात गणपतीसमोर बसल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे ध्यान लागणे, गणपतीने त्यांना ‘जास्वंदा’च्या फुलाविषयी सूक्ष्मातून ज्ञान देणे आणि गणपतीकडून प्रकाशाचा झोत त्यांच्या शरिराकडे येणे
मंदिरात काही कर्मचारी सोडले, तर कोणीच नव्हते. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ बराच वेळ देवासमोर बसल्या होत्या. ‘त्यांचे ध्यान लागले आहे’, असे जाणवत होते. नंतर त्या म्हणाल्या, ‘‘गणपतीने मला (श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना) ‘जास्वंदा’च्या फुलाविषयी सूक्ष्मातून ज्ञान दिले.’’ ‘गणेशकला (गणेशकला, म्हणजे गणेशतत्त्वाकडून प्रक्षेपित होणारी प्रकाशवलये) जशी वाढत जातात, तसा त्याचा आकार जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्यांसारखा असतो’, असे त्यांना दिसले. नंतर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘गणपतीकडून प्रचंड प्रमाणात प्रकाश येत आहे आणि त्या प्रकाशाचा झोत माझ्या (श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या) शरिराकडे येत आहे.’’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), पुणे, महाराष्ट्र. (१८.१०.२०२२)
अष्टविनायकांना प्रार्थना !
स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदःबल्लाळस्तु विनायकस्त्वथ मढे चिन्तामणिस्थेवरे ।
लेण्याद्रौ गिरिजात्मजः सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरेग्रामे राञ्जणसंस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलम् ।।
अर्थ : गणांचा स्वामी असलेल्या श्री गजाननाचे, तसेच मोरगावचा मोरेश्वर, सिद्धटेक येथील (सर्व सिद्धी देणारा) सिद्धेश्वर यांचे जो स्मरण करतो, त्याचे कल्याण होवो. पाली येथे ‘बल्लाळेश्वर’ या नावाने रहाणारा, महड येथील ‘वरदविनायक’, थेऊर येथील ‘चिन्तामणि’, लेण्याद्रीचा ‘गिरिजात्मज’, उत्तम वर देणारा ओझरचा ‘विघ्नेश्वर’, रांजणगावचा ‘महागणपति’ सर्वांवर सदैव कृपा करो !
|