नागपूर येथे ‘स्वाइन फ्ल्यू’मुळे ४ जणांचा मृत्यू !

नागपूर – नियंत्रणात आलेल्या ‘स्वाइन फ्ल्यू’ आजाराने जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढले आहे. ‘स्वाइन फ्ल्यू’मुळे ४ जणांचा मृत्यू झाल्याने महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. येथील महापालिकेत झालेल्या मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत आणखी ४ मृत्यू ‘स्वाइन फ्ल्यू’ने झाल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले.

मृत्यू झालेल्यांमध्ये नागपूर ग्रामीण १, चंद्रपूर जिल्ह्यातील १ आणि मध्य प्रदेशातील २ रुग्णांचा समावेश होता. या बैठकीत शहरात आजपर्यंत आढळलेल्या ६४७ रुग्णांपैकी ५६६ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचे पुढे आले. आजपर्यंत महापालिका क्षेत्रातील १९, नागपूर ग्रामीणचे ९, जिल्ह्याबाहेरील १८, इतर राज्यांतील १४, असे एकूण ६० रुग्ण दगावल्याचे स्पष्ट केले गेले.

राज्यातील ‘स्वाइन फ्ल्यू’च्या एकूण ११२ मृत्यूंपैकी ८५ रुग्णांचा मृत्यू (७५.८९ टक्के) हा पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे आणि नागपूर या ५ महापालिका क्षेत्रांतील आहे. सर्वाधिक ३६ रुग्णांचे मृत्यू पुणे येथील आहेत. येथे ८५७ रुग्णांची नोंद झाली आहे. कोल्हापूर येथे १६८ रुग्णांपैकी १५ रुग्णांचा मृत्यू, नाशिक येथे २१७ रुग्णांपैकी १६ रुग्णांचा मृत्यू, ठाणे येथे ३५३ रुग्णांपैकी ९ रुग्णांचा मृत्यू, नागपूर महापालिका क्षेत्रात ३३१ रुग्णांपैकी ९ रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला आहे. राज्यात सर्वत्र यंदा ‘स्वाइन फ्ल्यू’चा मृत्यूदर अधिक असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.