निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ७६
१. केवळ २ वेळा आहार घेण्यासंदर्भातील काही अपसमज
‘एका साधकाच्या घरी सकाळचा अल्पाहार ८ वाजता, दुपारचे जेवण १२ वाजता, सायंकाळचा चहा-फराळ ४ वाजता, तर रात्रीचे जेवण ८ वाजता असते. त्या साधकाने मनाचा दृढ निश्चय करून ‘केवळ दुपारी आणि रात्री जेवीन. सकाळचा आणि सायंकाळचा अल्पाहार करणार नाही’, असे ठरवले. असे केल्यावर त्याला ते सहज जमूही लागले. कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्याला दुपारच्या जेवणाच्या वेळी चांगली भूक लागू लागली आणि जेवणही चांगल्या प्रकारे जाऊ लागले. त्या घरातील इतर माणसे मात्र ४ – ४ वेळा खातात. ‘२ वेळा आहार घेणेच योग्य आहे’, हे अजून त्यांच्या लक्षात आलेले नाही. त्यामुळे ते या साधकाला सांगतात, ‘‘रात्री ८ ते दुपारी १२ पर्यंत काही न खाल्ल्याने तुला पित्ताचा त्रास होईल. एवढा वेळ उपाशी रहाणे चांगले नाही. आता तुला २ वेळा आहार घेणे जमत असेलही; पण काही मासांनी तुझे पित्त पुष्कळ वाढेल आणि तुला त्रास होईल. तुझे वजन न्यून होईल. आधीच तुझी शरीरयष्टी कृश आहे. त्यामुळे तू अधिक वेळा खायला हवे. तू वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यायला हवा.’’
२. केवळ २ वेळा पुरेसा आहार घेतल्याने लाभच होत असल्याने तसे जमावे यासाठी प्रयत्न करा !
आपण शरिराला जशी सवय करू, तशी सवय लागते. एखाद्याला २ वेळा आहार घेणे जमत असेल, तर रात्री ८ ते दुपारी १२ पर्यंत काही न खाल्ल्याने त्याचे पित्त वाढत नाही. उलट एवढा वेळ उपवास घडल्याने अन्नाचे पूर्ण पचन होते आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते. ज्याला २ वेळाच आहार घेण्याची सवय आहे, त्याला सर्दी, खोकला, ताप यांसारखे त्रास वारंवार होत नाहीत. पूर्वीची ४ वेळा खाण्याची सवय असतांना मनाचा दृढ निश्चय करून २ वेळा खाण्याची सवय अंगी बाणवली, तर अवेळी पित्त बनणेही थांबते. त्यामुळे कालांतराने पित्त वाढण्याचा प्रश्न येत नाही. २ वेळा आहार घेण्याची सवय लागल्यावर भूक चांगली लागते आणि आहारामध्ये वाढ होते. दिवसभरातील एकूण आहाराचे प्रमाण घटत नाही. त्यामुळे व्यक्ती कृश असली, तरी तिचे वजन न्यून होत नाही. लठ्ठ व्यक्तींनी त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेवल्यास त्यांचा अनावश्यक वाढलेला मेद (चरबी) मात्र अवश्य न्यून होतो. वजन वाढवण्यासाठी अधिक वेळा खाण्याची आवश्यकता नसते. पौष्टिक आहार घेणे आणि तो पूर्णपणे पचवणे आवश्यक असते. आहार पूर्णपणे पचण्यासाठी पचनशक्ती चांगली हवी. केवळ २ वेळा आहार घेण्याची सवय अंगी बाणवल्याने पचनशक्ती उत्तम रहाते. एखाद्याला २ वेळा आहार घेणे सहजपणे जमत असेल, तर त्याने वैद्यांचा समादेश घेण्याची आवश्यकता नाही. उलट ज्यांना २ वेळा आहार घेणे जमत नसेल किंवा तसे केल्यावर त्रास होत असेल, त्यांनी ‘२ वेळा आहार घेणे स्वतःला कसे जमेल’, हे समजून घेण्यासाठी वैद्यांचा समादेश अवश्य घ्यायला हवा.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१०.२०२२)