युक्रेनमधील ‘काक्होव्का’ धरणावर रशिया आक्रमण करू शकते ! – झेलेंस्की यांचा दावा

युक्रेनच क्षेपणास्त्रांचा मारा करून धरण नष्ट करण्याच्या प्रयत्नात ! – रशियाचा प्रत्यारोप

कीव (युक्रेन) – रशिया हा दक्षिण युक्रेनमधील जलविद्युत् प्रकल्पातील ‘काक्होव्का’ धरण नष्ट करण्याचे षड्यंत्र आखत आहे, असा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी केला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होणार असल्याचेही ते म्हणाले. हे धरण ‘नीपह’ नदीवर बांधण्यात आले असून रशियन सैन्य त्याला केव्हाही उडवून लावू शकते, अशी युक्रेनी गुप्तचरांना माहिती मिळाल्याचे ते म्हणाले.

सध्या हे धरण रशियाच्या ताब्यात असून रशियाने युक्रेनवर प्रत्यारोप केला आहे की, तोच क्षेपणास्त्रांचा मारा करून हे धरण नष्ट करू पहात आहे. हे धरण खेरसन क्षेत्रामध्ये असून त्यावर काही प्रमाणात रशियाने नियंत्रण मिळवले आहे. रशियन अधिकार्‍यांनी दावा केला की, युक्रेनी सैन्याने ॲन्तॉनिव्स्की पुलावर केलेल्या आक्रमणात ४ जण ठार झाले आहेत.

रशिया या क्षेत्रातील ५० ते ६० सहस्र नागरिकांना युक्रेनच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी सुरक्षित ठिकाणी हालवत आहे. युक्रेनने मात्र याचा निषेध करत जनतेला बलपूर्वक हालवले जात असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे रशियन सैन्याचे युक्रेनमधील प्रमुख जनरल सुरोविकिन यांनी आरोप केला की, युक्रेनी सैन्य बंदी घालण्यात आलेल्या पद्धतींनी खेरसन शहरावर आक्रमण करू शकते. त्यामुळेच तेथील जनतेला हालवले जात आहे.