१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सत्संगात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची भावजागृती झालेली पाहून त्यांना प्रसाद देणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची भावजागृती झाली; म्हणून त्यांनी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना प्रसाद दिला. या प्रसंगी सद्गुरु राजेंद्रदादांची पुष्कळ भावजागृती झाली. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु राजेंद्रदादा यांच्यामध्ये झालेला संवाद येथे दिला आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही मला भावजागृतीचा आनंद देत आहात. माझा भाव जागृत होत नाही; पण तुम्ही माझ्यावर केवढे उपकार केले.
सद्गुरु राजेंद्र शिंदे (सद्गदित होऊन) : माझी पात्रता नसतांना तुम्ही प्रसाद देऊन माझा सन्मान करत आहात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : पात्रता नसतांना ?
सद्गुरु राजेंद्र शिंदे : माझ्याकडून काहीच प्रयत्न होत नाहीत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : अशी स्वतःच स्वतःची पात्रता कशी ठरवायची ? (सद्गुरु राजेंद्रदादांच्या पत्नी सौ. मीनल शिंदे आणि मुलगी कु. वैदेही यांना उद्देशून) ‘मी यांना प्रसाद दिला’, ते बरोबर आहे ना ?
सौ. मीनल शिंदे आणि मुलगी कु. वैदेही शिंदे : हो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : पहा ! या दोघींनी ‘हो’ म्हटले.
२. अहंशून्य असलेले सद्गुरु राजेंद्रदादा !
वरील संवाद चालू असतांना उपस्थित सर्वांचीच भावजागृती झाली होती. सद्गुरुपदी असूनही ‘मी कुणी आध्यात्मिक अधिकारी नाही, सर्वसामान्य आहे’, अशा स्थितीत ते बोलत होते. प्रत्यक्षात त्यांना पुष्कळ शारीरिक त्रास असूनही सद्गुरु दादा समष्टी स्तरावर अनेक सेवा दायित्वाने पहात आहेत, तरीही त्यांच्या बोलण्यात कर्तेपणाचा लवलेशही नव्हता. उलट ‘माझ्याकडून काहीच होत नसतांनाही माझा सत्कार करत आहेत’, अशा भावाने ते सद्गदित झाले होते.
३. ‘संत कसे अहंशून्य असतात ?’, हे शिकण्याची संधी दिल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता वाटणे
सर्वसामान्य व्यक्ती आणि साधक यांच्या मनात थोडेसे काही केले, तरी ‘मी पुष्कळ करतो’, असे कर्तेपणाचे विचार असतात. त्यामुळे त्यांचा अहं जागृत रहातो; परंतु सद्गुरु राजेंद्रदादांच्या माध्यमातून सर्वांना ‘संत कसे असतात ?’, हे पुन्हा एकदा अनुभवता आले, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीही त्यांना प्रसाद देऊन ‘संत कसे असतात ?’, हे सर्वांना प्रत्यक्ष पहाण्याची आणि त्यातून शिकण्याची संधी दिली. त्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला या सत्संगानंतर निरोप पाठवला, ‘अशी भावजागृती होणारे हे पहिले संत आहेत आणि दैवी बालकांचे खरे महत्त्व सद्गुरु राजेंद्रदादांच्याच लक्षात आले आहे.’
– कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.