चिनी बनावटीचे फटाके विक्रीस आढळल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करणार !- करवीर शिवसेना

कोल्हापूर – आरोग्यासाठी हानीकारक आणि भारतीय अर्थव्यवस्था कुमकुवत करणारे असल्याने चिनी बनावटीचे फटाके व्यापार्‍यांनी विक्रीसाठी ठेवू नयेत. याचसमवेत देवता, राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके विक्रीसाठी ठेवू नयेत. चिनी बनावटीचे फटाके आढळल्यास शिवसेनेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येईल, असे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने गांधीनगर येथील घाऊन फटाके विक्रेत्यांना त्यांच्या दुकानात जाऊन देण्यात आले. याच समवेत दुकानांमध्ये चिनी विजेच्या माळा, पणत्या याही दुकानात विक्रीसाठी ठेवू नयेत यांसाठी प्रयत्न करावेत, अशीही मागणी त्या निवेदनात करण्यात आली आहे. या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, सर्वश्री वीरेंद्र भोपळे, कैलास जाधव, बाळासाहेब नलवडे, दीपक पोपटाणी, योगेश लोहार यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.