वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती वर्धापनदिनाचे आयोजन
वाराणसी (उत्तरप्रदेश) – आमच्यासाठी धर्म आणि राष्ट्र वेगळे नाहीत. धर्माचे सर्व मंत्र केवळ राष्ट्राच्या कल्याणासाठीच नाही, तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेने राष्ट्रासह विश्वाचे कल्याण होईल. आज संपूर्ण विश्व संस्कृती, आध्यात्मिक ज्ञान आणि विश्वशांती यांसाठी सनातन हिंदु धर्माकडे आशेची दृष्टी लावून बसले आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपण सर्वांनी आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंंगबाळ यांनी काढले.
हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त येथील शिवपूरच्या अष्टभुजा मंदिराच्या प्रांगणामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.
या वेळी सद्गुरु सिंगबाळ यांनी ‘हलाल जिहाद’ या विषयावरही उपस्थितांचे प्रबोधन केले. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने सौ. प्राची जुवेकर म्हणाल्या, ‘‘ज्या व्यक्तीचे आत्मबळ जागृत होते, तो परिणामकारकपणे धर्मप्रसार करू शकतो. त्यामुळे सर्वांनी धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे.’’ धर्माभिमानी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि त्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न’, याविषयी मार्गदर्शन केले. समितीच्या धर्मकार्याचा परिचय श्री. संजय सिंह यांनी करून दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत कार्यरत रहाण्याची प्रतिज्ञा घेतली.