(म्हणे) ‘मुसलमान श्री लक्ष्मीदेवीची पूजा करत नाहीत; म्हणून ते धनवान नाहीत का ?’

बिहारमधील भाजपचे आमदार ललन पासवान यांचे हिंदुद्रोही विधान !

भागलपूर (बिहार) – मुसलमान कधीही श्री लक्ष्मीदेवीची पूजा करत नाहीत; म्हणून ते धनवान नाहीत का ? ते कधी श्री सरस्वतीदेवीची पूजा करत नाहीत, तर ते विद्वान नाहीत का ?, असे हिंदुद्रोही प्रश्‍न येथील पीरपैती मतदारसंघाचे भाजपचे आमदार ललन पासवान यांनी केले. त्यांच्या विरोधात हिंदूंकडून आंदोलन करण्यात आले. तसेच पासवान यांचा पुतळाही जाळण्यात आला. त्यानंतर पासवान यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, माझ्या बोलण्याचा अर्थ असा नव्हता. मानले, तर देवता आणि नाही मानले, तर दगड. मी देवाला मानतो. मी सर्व देवतांची पूजा करतो. सर्व काही मानण्यावर आहे. जेव्हा त्यांना तर्काच्या, विज्ञानाच्या कसोटीवर पडताळले जाईल, तेव्हा तेही माझ्यासारखे होतील. (याला म्हणतात, पडलो, तरी नाक वर ! अशांच्या विरोधात हिंदूंनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करून त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! – संपादक)

१. ललन पासवान त्यांच्या भाषणात असेही म्हणाले की, बजरंग बली ही शक्तीची देवता आहे; मात्र मुसलमान किंवा अन्य धर्माचे लोक बजरंग बलीची पूजा करत नाहीत. अमेरिकेमध्ये त्याचे मंदिर नाही, तेथे पूजाही होत नाही; म्हणून अमेरिका शक्तीशाली देश नाही का ?

२. पासवान यांना विरोध होऊ लागल्यावर ते म्हणाले की, या विरोधाला कोणताही अर्थ नाही. जर दम असेल, तर तर्काच्या आधारे बोलावे. (हिंदूंच्या देवता या तर्काच्या नाही, तर श्रद्धेच्या आधारे पुजल्या जातात. हेही ठाऊक नसलेले पासवान भाजपचे आमदार आहेत, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक)

३. पासवान यांनी त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर सामाजिक कुप्रथा सांगत तेराव्याचे भोजन दिले नव्हते. पासवान म्हणाले की, हा सर्व वाद भोजन न दिल्यावरून आहे. यामुळेच माझा विरोध केला जात आहे.

भाजप, जनता दल (संयुक्त) आणि काँग्रेस यांच्याकडून टीका

भाजपचे राज्य प्रवक्ते प्रेम रंजन पटेल यांनी ललन पासवान यांना नास्तिक म्हटले. ‘नास्तिक व्यक्तीच अशा प्रकारची विधाने करू शकतो’, असे ते म्हणाले. काँग्रेस आणि जनता दल (संयुक्त) यांच्या नेत्यांनीही पासवान यांच्यावर टीका केली आहे.

संपादकीय भूमिका

  • भाग्यनगर येथील आमदार टी. राजा सिंह यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित अवमानकारक विधान केल्यावर त्यांना निलंबित करणार्‍या भाजपने पासवान यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
  • अशा हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते मोठ्या पदावर पोचल्यानंतर अशा प्रकारची विधाने करून हिंदूंचा बुद्धीभेद करतात, तसेच त्यांच्या विधानामुळे अन्य धर्मियांना हिंदु धर्मावर टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळते !