सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या २ घटना

  • एका युवकाला पोलीस कोठडी, एक जण पोलिसांच्या कह्यात

  • एक मुलगी २ मासांची गर्भवती

(प्रतिकात्मक चित्र)

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची एकूण २ प्रकरणे उघड झाली आहेत. यामध्ये एका प्रकरणातील मुलगी २ मासांची गर्भवती असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ युवकांना अटक केली असून त्यातील वेंगुर्ला येथील युवकाला न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी बजावली आहे, तर दुसर्‍या युवकाला १४ ऑक्टोबरला न्यायालयात उपस्थित केले जाणार आहे.

सावंतवाडी शहराच्या नजीक असलेल्या भागात घडलेल्या घटनेत संबधित युवकाने त्या मुलीला फसवून घरात कुणी नसल्याची संधी साधत अत्याचार केला होता. मुलीला त्रास होऊ लागल्याने तिच्या नातेवाइकांनी तिला तपासणीसाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले होते. त्या वेळी तपासणीत ती गर्भवती असल्याचे उघड झाले. याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी संशयित युवकाला अटक केली.

दुसरा प्रकार वेंगुर्ला तालुक्यात घडला असून पीडित मुलीच्या तपासणीनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले. या मुलीला नातेवाइकांनी नाकारल्यानंतर ती सावंतवाडी येथील ‘अंकुर’ या महिलांच्या वसतीगृहात होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • समाजाला धर्मशिक्षण देऊन नैतिकता न शिकवल्याचा आणि सामाजिक माध्यम, चित्रपट, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका यांवर दाखवण्यात येणारी कामुक दृश्ये यांचा हा दुष्परिणाम आहे ! मुली आणि महिला यांवरील अत्याचाराला ही आधुनिक साधने आणि त्याचा उदो उदो करणारे उत्तरदायी आहेत !
  • प्राचीन काळी मुली आणि महिला यांवर अत्याचार होत असत, असा बिनबुडाचा आरोप करणारे सामाजिक माध्यम, चित्रपट, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका यांविषयी गप्प बसतात !