राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या विरोधात ‘राष्ट्रद्रोही हुकूमशहा’ लिहिलेले फलक चीनमध्ये झळकले !

प्रशासानाने फलक त्वरित हटवले !

बीजिंग (चीन) – चीनमधील विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या शासनाच्या विरोधात जनतेमध्ये असंतोष पसरत असल्याची चिन्हे आहेत. १३ ऑक्टोबर या दिवशी राजधानी बीजिंगमधील अनेक दुकानांच्या बाहेर ‘राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना त्यांच्या पदावरून पायउतार करण्यात यावे’, अशी मागणी करणारे अनेक फलक लावल्याचे समोर आले. त्यांवर ‘राष्ट्रद्रोही हुकूमशहा’ असे लिहिल्याचेही सांगण्यात येत आहे. या फलकांवर  कोरोना प्रतिबंध हटवण्याची मागणीही करण्यात आली होती.

बीजिंगच्या रस्त्यांवरील या फलकांची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओज ट्विटरवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने हे फलक हटवले असले, तरी तोपर्यंत त्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून जगभरात प्रसारित झाले. सत्ताधारी साम्यवादी पक्षाच्या १६ ऑक्टोबर या दिवशी होणार्‍या २० व्या संमेलनामध्ये शी जिनपिंग हे राष्ट्राध्यक्षपदावर तिसर्‍यांदा निवडून येतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे जिनपिंग यांच्या विरोधातील फलकांना त्वरित हटवण्यात आले.

एका फलकावर लिहिले होते की, ‘आम्हाला कोविड परीक्षण नको, तर जेवण हवे आहे. आम्हाला दळणवळण बंदी नको. आम्हाला मुक्त करा !’ ‘झीरो कोविड पॉलिसी’च्या अंतर्गत कोरोनावर अटकाव आणण्यासाठी देशातील विविध भागांमध्ये पुन:पुन्हा दळणवळण बंदी लादण्यात येत आहे. त्यामुळेही हा विरोध केला जात आहे.

संपादकीय भूमिका

पंतप्रधान मोदी यांना ‘लोकशाहीची हत्या करणारे’ अथवा ‘हुकूमशहा’ संबोधून त्यांना हिणवणारे भारतातील साम्यवादी पक्ष आता शी जिनपिंग यांच्या विरोधात गप्प का ?