अमेरिकेतील किमान १२ टक्के मुलांना नैराश्य !

८ ते १८ वर्षांच्या ७ कोटी २० लाख मुलांची केली जाणार आरोग्य तपासणी !

प्रतिकात्मक चित्र

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेतील मुले काळजी आणि नैराश्य आदी मानसिक विकारांना मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. तेथील किमान १२ टक्के मुले मानसिक आजारांनी ग्रस्त झाली आहेत. हे पहाता तेथील स्वास्थ्य संघटनेने ८ ते १८ वर्षे वयोगटातील सर्व मुलांची नैराश्याच्या संदर्भातील तपासणी करण्याची शिफारस केली आहे. मुलांमध्ये आत्महत्येचे विचारही वेगाने वाढत असतांनाच ही शिफारस करण्यात आली आहे. अमेरिकेच्या ‘प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिसेस टास्क फोर्स अ‍ॅडव्हायझरी ग्रूप’ने सांगितले की, या तपासणीमुळे मुलांमधील मानसिक तणाव अल्प होईल.

अमेरिकेत १८ वर्षे अथवा त्याहून अल्प वयाचे एकूण ७ कोटी २० लाख मुले असून त्यांपैकी ८५ लाख मुले नैराश्यग्रस्त असल्याचे ‘टास्क फोर्स’च्या संशोधनात आढळले. त्यामुळे उर्वरित मुलांचीही तपासणी करण्यात यावी, असे या संघटनेचे म्हणणे आहे. ‘टास्क फोर्स समिती’च्या सदस्या आणि मसान विद्यापिठाच्या प्रा. मार्था कुविक सांगतात, ज्या मुलांच्या मानसिक आरोग्याची नियमित तपासणी झाली नाही, त्यांची तपासणीही या अभियानाच्या माध्यमातून होईल.’

तरुणांमध्ये आत्महत्येची जोखीम वाढली !

‘नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅॅटिस्टिक्स’च्या सप्टेंबरच्या अहवालानुसार १५ ते २४ वर्षांच्या तरुणांमध्ये आत्महत्येची जोखीम वाढली आहे. १० ते १४ वर्षांच्या १६ टक्के मुलींनी आत्महत्या केल्याचे वर्ष २०२०-२१ च्या सर्वेक्षणात आढळले.

संपादकीय भूमिका

  • चंगळवादी संस्कृती आणि अध्यात्मविहीन जीवन यांमुळेच आज लोक नैराश्य आदी मानसिक विकारांना बळी पडत आहेत, हे लक्षात घ्या !
  • भारतातील स्थितीही काही वेगळी नाही. पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणार्‍या भारतीय हिंदूंनी लक्षात ठेवावे की, तेही त्यांच्या पाल्यांना नैराश्यग्रस्त करण्याच्या मार्गावरच नेत आहेत !