निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ७०
‘पावसाळा संपून थंडी चालू होईपर्यंतच्या काळाला शरद ऋतू म्हणतात. या ऋतूच्या आरंभीच्या काळामध्ये तापाची साथ येण्याची शक्यता असते. ताप आलेला असतांना दिवसातून २ वेळाच आहार घ्यावा. आहारामध्ये वरण, भात, तूप आणि आवश्यकता वाटल्यास चवीसाठी थोडेसे लोणचे घ्यावे. अन्य वेळी अधेमधे पिण्याच्या पाण्यामध्ये १ लिटरमागे २ चमचे धने, पाव चमचा वाळा चूर्ण, पाव चमचा नागरमोथा चूर्ण घालून उकळलेले पाणी प्यावे. (प्रमाण मोजण्यासाठी चहाचा चमचा वापरावा.) ताप असतांना दूध, दही किंवा ताक घेऊ नये. अधेमधे खाणे टाळावे.
केवळ २ वेळाच वरीलप्रमाणे आहार घेतल्याने ताप लवकर बरा होतो; परंतु काहींना घन अन्न जात नसेल, तर दिवसभरात भूक लागेल त्या वेळी मुगाच्या डाळीचे वरण, कढण (मूगडाळ शिजवून तिच्यामध्ये चवीपुरते मीठ आणि गूळ घालून बनवलेला पातळ पदार्थ) किंवा भाजलेल्या गव्हाच्या बारीक रव्याची दूध न घालता केलेली पातळ खीर प्यावी. पातळ आहार २ पेक्षा अधिक वेळा घेतल्यास चालतो.’
सनातनची वाळा (संस्कृत नाव : उशीर) आणि नागरमोथा (संस्कृत नाव : मुस्ता) ही चूर्णे उपलब्ध आहेत.
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०२२)