न्यायालयाकडून लटके यांचा राजीनामा आज संमत करण्याचा आदेश

ऋतुजा लटके

मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झालेल्या ऋतुजा लटके यांनी त्यांचा राजीनामा संमत न झाल्याने उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

न्यायालयाने मुंबई महापालिका आयुक्त चहल यांना निर्णय घेण्यासाठी घंट्याभराचा अवधी दिला. त्यानंतर १४ ऑक्टोबर या दिवशी त्यांचा राजीनामा संमत करण्याचे आदेश न्यायालयाने आयुक्तांना दिले आहेत.

ऋतुजा लटके यांच्याकडे पालिकेची कोणतीही थकबाकी शिल्लक नाही, तसेच १ मासाचे वेतनही त्यांनी पालिकेकडे जमा केले आहे. त्यांचा राजीनामा सहआयुक्त संमत करू शकतात; तरीही त्यांचा राजीनामा संमत न झाल्याने हे प्रकरण न्यायालयात नेण्यात आले.

हेमांगी वरळीकर यांनीही वर्ष २०१२ मध्ये निवडणूक लढवण्यासाठी अशाच प्रकारे नोकरी सोडली होती, तेव्हा त्यांचा राजीनामा १ मासाच्या आत संमत करण्यात आला होता.