पंजाबमध्ये बंदीवानांना त्यांच्या जोडीदाराशी एकांतात भेटता येणार !

अमृतसर (पंजाब) – पंजाब सरकारने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील कारागृहांत बंदीवानांना त्यांच्या जोडीदारासमवेत २ घंटे एकांतात घालवण्यासाठी स्वतंत्र खोली ठेवण्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये स्वतंत्र दोन पलंग, पटल आणि संलग्न प्रसाधनगृह असतील. सध्या इंदवाल साहिब, नाभा, लुधियाना आणि भटिंडा महिला कारागृहांत ही सुविधा चालू करण्यात आली आहे. पंजाब सरकारने सांगितले की, ही सुविधा कुख्यात गुंड आणि लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित खटल्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या दोषींना मिळणार नाही. या सुविधेसाठी बंदीवान प्रथम कारागृह प्रशासनाला अर्ज करतो. अर्ज संमत झाल्यानंतर चांगले वर्तन असलेल्या बंदीवानांना त्यांच्या जोडीदारासमवेत २ घंटे रहाण्याची अनुमती दिली जाते.

१. पंजाब सरकारने काही नियमांची सूचीही बनवली आहे. सर्व प्रथम पती-पत्नी असल्याचे विवाह प्रमाणपत्र दाखवावे लागेल. यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र ज्यामध्ये एच्.आय.व्ही. (एड्स), लैंगिक संक्रमित रोग (एस्.टी.डी.), कोरोना संसर्ग आणि इतर कोणताही आजार नसावा.

२. पती-पत्नीखेरीज पंजाब सरकारने कुटुंबातील इतर सदस्यांना भेटण्यासाठी कार्यक्रमही चालू केला आहे. ज्यामध्ये एक बंदीवान एका सभागृहामध्ये त्याच्या कुटुंबातील ५ सदस्यांसह तासभर भेटू शकतो. ते एकत्र बसून खाऊ, पिऊ आणि बोलूही शकतात.

३. भारताबाहेरील अनेक देशांमध्ये कारागृहात असलेले बंदीवान त्यांच्या जोडीदाराला वेगळ्या खोलीत भेटतात. कॅनडा, अमेरिका, जर्मनी, फिलिपाइन्स, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ही सुविधा दिली जाते.