विदेशी ॲपमध्ये पैसे गुंतवल्यामुळे सोलापूरवासियांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

अतीलोभाचा दुष्परिणाम !

काय आहे प्रकरण ?

‘क्लाऊड मायनर ॲप’ हे एक अमेरिकी आस्थापन असून ‘अवघ्या काही दिवसांत पैसे दामदुप्पट करून देत आहे’, असे येथील नागरिकांना समजल्यावर अनेकांनी सहस्रो कोटी रुपयांची गुंतवणूक केली. प्रारंभी ५ सहस्र रुपयांपासून या संकेतस्थळावर गुंतवणूक चालू झाली. अनेकांना मोठा परतावा मिळाला. त्यातूनच लोकांनी गुंतवणुकीची रक्कम वाढवायला आरंभ केला; मात्र गेल्या ३ ते ४ दिवसांपासून परतावा मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे पैसे बुडाल्याची शक्यता गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत.

सोलापूर – येथे ऑनलाईन ॲपद्वारे गुंतवणूक केलेले कोट्यवधी रुपये बुडाले आहेत.  ‘क्लाऊड मायनर ॲप’ या विदेशी ॲपमध्ये पैसे गुंतवल्यानंतर काहीही काम न करता केवळ भ्रमणभाषद्वारे अत्यंत कमी दिवसांत दुप्पट किंवा तीनपट पैसे मिळतील, या आशेने सोलापूर येथील शेकडो लोकांनी पैसा गुंतवला. फसवणुकीचा हा आकडा कोट्यवधी रुपयांमध्ये असण्याची शक्यता आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांकडून सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

तांत्रिक माहिती नसतांना ‘व्हर्चुअल’ गुंतवणूक केल्याने लोकांना फटका बसत आहे, अशी माहिती नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रातील तज्ञ देत आहेत. अपकीर्तीच्या भीतीने अनेक जण समोर येऊन तक्रार द्यायला घाबरत आहेत. त्यामुळे अशा फसवणूक करणार्‍यांचे फावत आहे.