देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते (वय ६८ वर्षे) यांची गुणवैशिष्ट्ये !

आश्विन पौर्णिमा, म्हणजे कोजागिरी पौर्णिमा (९.१०.२०२२) या दिवशी श्री. बाळासाहेब विभूते (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांचा ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. बाळासाहेब विभूते

१. सौ. अंजली विभूते (श्री. बाळासाहेब विभूते यांच्या पत्नी) (वय ५९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

सौ. अंजली विभूते

१ अ. पत्नीस संपूर्ण साहाय्य करणे : ‘पूर्णवेळ साधना करू लागल्यानंतर आम्ही देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात आलो. तेथे गेल्यावर
श्री. विभूते यांनी शारीरिक, मानसिक, आणि आध्यात्मिक स्तरांवरील त्रासांशी लढण्यासाठी मला सर्व साहाय्य केले. मला त्रास होत असतांना ‘मला खोलीत अल्पाहार, जेवण आणून देणे; मला अंघोळ घालणे; माझे कपडे धुणे’, अशा प्रकारे त्यांनी माझी काळजी घेतली. हे करतांना आश्रमातील सेवा सुद्धा त्यांनी भावपूर्ण केल्या.

१ आ . आदर्श पती असणे : माझ्यासाठी संधीवाताचे उपचार, दातांचे उपचार, इतरही शस्त्रकर्म यांसाठी पुष्कळ व्यय झाला. त्यांनी सर्व उपचार योग्य पद्धतीने होण्यास महत्त्व दिले. मला लवकर बरे वाटावे आणि माझी साधना व्हावी, यासाठी ते प्रयत्नरत असतात. माझ्या साधना प्रवासातील या आदर्श जोडीदारामुळे या खडतर प्रवासातही मला सहज मात करता आली. ‘हे गुरुदेवा, असे पती मिळाल्यामुळे मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.’

२. श्री. अभिजीत विभूते (श्री. बाळासाहेब विभूते यांचा मोठा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्री. अभिजीत विभूते

२ अ. संतांप्रती श्रद्धा

२ अ १. संतांच्या वागण्यामागील भावार्थ जाणणे : ‘वर्ष १९९८ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका संतांच्या भेटीला माझे वडील श्री. बाळासाहेब विभूते आणि काही साधक गेले होते. तेथे सर्व साधक रांगेत उभे राहून दर्शन घेत होते. ते संत दर्शन घेणार्या लोकांना शिव्या घालत होते, तसेच काही वेळा मारतही होते; म्हणून काही साधक त्या रांगेतून बाजूला झाले; परंतु बाबा बाजूला गेले नाहीत. त्यांचा क्रमांक आल्यावर त्या संतांनी बाबांना पुष्कळ शिव्या घातल्या, तरी बाबा हात जोडून उभे राहिले. ते संत तिथून गेल्यावर सगळे साधक बाबांना म्हणू लागले, ‘‘तुम्ही एवढे चांगले असतांना शिव्या दिल्या. आम्हाला तर मारलेच असते.’’ बाबांनी त्यांना सांगितले, ‘‘त्यांनी मला शिव्या घातल्या नाहीत, तर माझ्या अहंकाराला घातल्या. माझा उद्धार केला; म्हणून मी गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कृतज्ञता व्यक्त केली. याचे तात्पर्य ‘संत असे का वागतात ?’, याचा भावार्थ लक्षात घ्यावा.’’

१ अ २. प.पू. पांडे महाराज यांच्यावरील श्रद्धेमुळे त्यांच्या वचनाची प्रचीती येणे : वर्ष २०१५ मध्ये बाबांना हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आला होता. त्या वेळी शस्त्रकर्म करण्यासाठी त्यांना रुग्णालयात घेऊन जाणार होते. तेव्हा मी आणि बाबा परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांना भेटायला गेलो होतो. बाबांना शस्त्रकर्माची पुष्कळ भीती वाटत होती. तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराजांनी त्यांना सांगितले, ‘‘तुला शस्त्रकर्माची आवश्यकता पडणार नाही.’’ त्यांनी प्रेमाने जवळ घेऊन बाबांना उपाय सांगितले आणि प्रत्यक्ष अनुभवसुद्धा तसाच आला. आधुनिक वैद्य शस्त्रकर्म विभागात (ऑपरेशन थिएटरमध्ये) त्यांना घेऊन गेले आणि १० मिनिटांत बाहेर येऊन म्हणाले, ‘‘शस्त्रकर्माची आवश्यकता नाही.’’ तेव्हा संतांच्या संकल्पाचीच प्रचीती आली.

२ आ. ‘मुलांनी धर्मकार्यापासून परावृत्त होऊ नये’, यासाठी प्रसंगी दोर कापण्याची सिद्धता दर्शवणारे आधुनिक शेलारमामा !

२ आ १. निवृत्तीवेतन मिळण्यात अडथळे येत असूनही भ्रष्टाचाराचा मार्ग न अवलंबणे : वर्ष २०१२ मध्ये बाबांना निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम आणि निवृत्तीवेतन (पेन्शन) चालू होण्याच्या कार्यवाहीसाठी लागणारी प्रक्रिया यांमध्ये पुष्कळ अडथळे येत होते. त्यांचेच सहकारी आणि कार्यालयीन कर्मचारी हे काम करण्यासाठी त्यांना पैसे पाहिजे असल्याने त्यांत अडथळे आणत होते. हा भ्रष्टाचार बाबांना मान्य नसल्याने बाबा पैसे न देण्यावर ठाम राहिले.

२ आ २. मुलांनी ‘पैशाच्या आसक्तीने व्यवहारात गुंतू नये’, यासाठी निवृत्तीवेतनाची रक्कम सनातन संस्थेला अर्पण करण्याची सिद्धता दर्शवणे : पैसे मिळाल्यावर ‘देवानेच त्यांना सर्व पैसे मिळवून दिले’, हा त्यांचा भाव होता. पूर्णवेळ साधना करू लागल्यावर बाबांनी गुरुदेवांना पत्र लिहून विचारले, ‘माझी दोन मुले पूर्णवेळ साधक आहेतच. माझ्या दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत. आता मला मिळालेली रक्कम मी सनातन संस्थेला अर्पण करू शकतो का ?’ यामागे त्यांचा उद्देश असा होता, ‘पैसे पाहून मुलांच्या मनात ‘व्यवहार किंवा प्रपंच करावा’, अशी इच्छा निर्माण होऊ नये.’ जसे ‘सिंहगडावर लढतांना तानाजी मालुसरे धारातीर्थी होऊन कोसळून खाली पडतात, तेव्हा सर्व मावळे कड्यावर वरून खाली टाकलेल्या दोरखंडाच्या दिशेने धावतात. ते पाहून ८० वर्षे असणारे शेलारमामा तो दोरखंड कापून टाकतात अन् म्हणतात, ‘तुमचा बाप येथे मरून पडलाय अन् तुम्ही माघार घेऊन पळ काढताय !’ त्याप्रमाणे दोरखंड, म्हणजे पैसा पाहून ‘मुलांनी धर्मकार्यापासून मागे वळू नये’, हा त्यांचा उद्देश होता.

२ आ ३. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) ‘अर्पण नको’, असे सांगून त्यांचा त्याग आणि मनाची सिद्धता यांचे कौतुक करणे : हा त्याग आणि मनाची सिद्धता पाहून गुरुदेवांनी त्यांचे कौतुक केले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी तर त्यांना ‘कलियुगातील शेलारमामा’ असे उद्बोधले. गुरुदेव म्हणाले, ‘‘अर्पण नको. पुढेमागे मुलांसाठी उपयोगी पडतील.’’\

या कलियुगात स्वतःची मुले धर्मासाठी अर्पण करणारे, आपली कमावलेली संपत्ती देवाला अर्पण करण्याची सिद्धता दाखवणारे, आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्या आई-बाबांच्या पोटी आम्हाला जन्म दिल्याबद्दल आणि जन्मोजन्मीच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवणार्या गुरुमाऊलींच्या चरणी मी कृतज्ञ आहे.’

(सर्व लिखाणाचा दिनांक २४.९.२०२२)