पुणे – शहरातील सांस्कृतिक महोत्सवाचा केंद्रबिंदू असणारा यंदाचा ६८ वा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ १४ ते १८ डिसेंबर या कालावधीमध्ये मुकुंदनगरमधील ‘कटारिया शाळे’च्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ‘आर्य संगीत प्रसारक मंडळा’चे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली. पंडित भीमसेन जोशी यांनी वर्ष १९५३ पासून त्यांचे गुरु सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व’ महोत्सवाचे आयोजन करण्यास प्रारंभ केला. पंडितजींच्या निधनानंतर या महोत्सवाचे नामकरण ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे करण्यात आले. कोरोना काळात हा महोत्सव साजरा केला नाही. या वर्षी पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी असल्याने या महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.