ऋषीमुनींनी केलेल्या सर्व संशोधनाचा अभ्यास केला पाहिजे ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

  • हिंदु जनजागृती समितीचे द्विदशकपूर्तीनिमित्त अभियान !

  • रामटेक (नागपूर) येथील ताई गोळवलकर महाविद्यालयात ‘भारतीय संस्कृती आणि संस्कार’ या विषयावर मार्गदर्शन !

श्री. सुनील घनवट यांचे स्वागत करतांना सौ. स्वतंत्रता कामदार, मध्यभागी श्री. श्रीकांत पिसोळकर

नागपूर – पहिले विमान कुणी बनवले ? असा प्रश्न कुणीही विचारल्यास सर्वजण राईट बंधूंचे नाव सांगतात; पण प्रत्यक्ष सहस्रो वर्षांपूर्वी ऋषि भारद्वाज यांनी विमानाचा शोध लावला होता, हे आपल्याला कुठेही शिकवले जात नाही. अभ्यासक्रमातही इतिहासाचे मोठ्या प्रमाणात विकृतीकरण होत आहे. इतिहासाच्या पुस्तकात योद्धा आणि राष्ट्रपुरुष यांच्या शौर्याचा इतिहास ४ ओळींत, तर आक्रमक मोगलांचा इतिहास ६० हून अधिक पानांचा शिकवला जातो. गोवा राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास केवळ चार ओळींत शिकवला जात होता. याविरोधात हिंदु जनजागृती समितीने आंदोलन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ५ पानांमध्ये समाविष्ट करण्यात आला. ऋषीमुनींनी केलेल्या सर्व संशोधनाचा आपण अभ्यास केला पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. रामटेक (नागपूर) येथील ताई गोळवलकर महाविद्यालयात ‘भारतीय संस्कृती आणि संस्कार’ या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या व्याख्यानाला विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. २२५ विद्यार्थ्यांची उपस्थिती या वेळी लाभली.

क्षणचित्रे

१. ताई गोळवलकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंग्रू यांनी हे व्याख्यान घेण्याची अनुमती देऊन नियोजन केले होते.

२. महाविद्यालयात शिक्षकांसाठी पाक्षिक वर्ग चालू करण्याचे नियोजन केले आहे.