बीकेसी मैदानातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा !
मुंबई – शिवसेना राष्ट्रभक्तांची आहे. भारतात राहून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ च्या घोषणा देणार्या पिलावळींना ठेचून काढले जाईल. देशाची एकात्मता आणि अखंडता यांना नख लावण्याचा प्रयत्न केला, तर खपवून घेतले जाणार नाही. देशाच्या विरोधात कारवाई करणार्यांना सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. महाराष्ट्रात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला ठेचले जाईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्यात केली. शिवसेनेतून बाहेर पडून सत्ता स्थापन केल्यानंतर प्रथमच झालेल्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले,
१. कुठलाही देशविघातक पक्ष, स्लीपर सेल असो, त्यांचा बिमोड केला जाईल, अशी चेतावणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातली; म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीची मागणी करणे हास्यास्पद आणि मूर्खपणाचे आहे. हे विचार ‘राष्ट्रवादी’चे आहेत, हे कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही. देशावर आपत्ती आली, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धावून आला आहे. राष्ट्र उभारणीच्या पवित्र कार्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात कुणीही धरू शकत नाही.
२. हिंदुत्व आणि महाराष्ट्राचे हित यांसाठी आम्ही बंड केले आहे. आम्हाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आम्ही केले ते राज्याच्या हितासाठी ! शिवसेना ही ना उद्धव ठाकरे यांची आहे, ना एकनाथ शिंदे यांची आहे ! शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आहे ! सत्तेसाठी लाचार होऊन आम्ही शिवसेनेचा विचार सोडणार नाही. सत्तेपेक्षा आम्हाला सत्य आणि सत्त्व महत्वाचे आहे. आमच्या हृदयातील बाळासाहेबांचे धगधगते विचार कुणालाही काढता येणार नाहीत.
३. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आम्ही जीवापाड जपला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आम्हाला अभिमान आहे. वैचारिक प्रतिवाद असू शकतो; परंतु स्वातंत्र्यामध्ये काहीच योगदान नाही का ? ‘शिदोरी’ मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख ‘माफीवीर’ असा करण्यात आला. त्या वेळी का बोलला नाहीत ? हिंदुत्व गुंडाळले म्हणूनच आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागली.