मुंबई, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदु धर्मामध्ये विवाहित स्त्रीने कपाळावर लावलेले कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. असे असतांना वर्ष २०२१ मध्ये ‘मलबार गोल्ड अँड डायमंड’, ‘तनिष्क’, ‘फॅब इंडिया’ या आस्थापनांनी हिंदूंच्या पवित्र सणानिमित्त केलेल्या दागिन्यांच्या विज्ञापनांमध्ये जाणीवपूर्वक महिलांना कुंकूविना दाखवण्याचा खोडसाळपणा केला होता. समस्त धर्मप्रेमी हिंदूंनी केलेल्या जोरदार विरोधानंतर याच आस्थापनांनी यावर्षी दिवाळीनिमित्त केलेल्या दागिन्यांच्या विज्ञापनांत महिलांना कुंकूसहित दाखवले आहे.
१. वर्ष २०२१ मध्ये ‘तनिष्क’ या आस्थापनाच्या विज्ञापनामध्ये महिलेला कुंकूविना दाखवण्यात आल्यावर लेखिका शेफाली वैद्य यांनी ‘#NobindiNoBusiness’ या ‘हॅश टॅग’द्वारे आवाजही उठवला होता. समस्त धर्मप्रेमी हिंदूंनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
२. त्यानंतर तनिष्क आस्थापनाने विज्ञापन मागे घेऊन कुंकू लावलेली स्त्री असलेले नवीन विज्ञापन केले. ‘फॅब इंडिया’ या ‘फॅशन ब्रँड’ने तर दिवाळीनिमित्त केलेल्या विज्ञापनात तर ‘जश्न-ए-रिवाझ’ हे उर्दू नाव देऊन हिंदूंच्या भावनांना जाणीवपूर्वक दुखावल्या. या विज्ञापनातही महिलेला कुंकूविना दाखवण्यात आले होते.
३. हिंदूंच्या विरोधानंतर या आस्थापनाने हे विज्ञापन मागे घेतले होते. ‘मलबार गोल्ड अँड डायमंड’ या आस्थापनाने अक्षय तृतीयेनिमित्त केलेल्या विज्ञापनात करिना कपूर खान हिला घेऊन कुंकूविना दाखवले. हिंदूंच्या विरोधानंतर आस्थापनाने विज्ञापन मागे घेऊन करिना कपूर खान हिच्याऐवजी तमन्ना भाटिया या अभिनेत्रीला कुंकवासहित दाखवून नवीन विज्ञापन केले.
४. मागील वर्षी या आस्थापनांच्या हिंदुविरोधी प्रकाराला हिंदूंनी वेळीच विरोध केल्यामुळे यावर्षी विविध आस्थापनांनी आतापर्यंत दिवाळीनिमित्त केलेल्या दागिन्यांच्या विज्ञापनांमध्ये महिलांना कुंकवासहित दाखवले आहे. हा एकप्रकारे हिंदूंच्या संघटित शक्तीचा परिणाम असल्याचे दिसून आले.
संपादकीय भूमिकाधर्मप्रेमी हिंदूंनी तत्परतेने केलेल्या विरोधाचा परिणाम ! असा संघटितपणा आणि तत्परता हिंदूंनी प्रत्येकच आघाताच्या वेळी दाखवावी ! |