गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात मद्याची अवैध वाहतूक करणार्‍यांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई होणार  

गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणार्‍या रस्त्यांवर पोलीस तपासणी नाकी उभारणार

मुंबई – गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्हा पर्यायाने महाराष्ट्र राज्यात होणार्‍या मद्याच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी अशी वाहतूक करणार्‍यांवर थेट ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा’ (Maharshtra Control of Organised Crime Act – मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये गोवा राज्यातून अवैधपणे एक बाटली जरी मद्य आणले, तरी त्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी चेतावणी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

याविषयी मंत्री देसाई यांनी सांगितले की, ‘या संदर्भात आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. अशा प्रकरणात एकाच व्यक्तीकडून जर ३ वेळा गुन्हा घडला, तर मकोका लावता येईल का ? हे तपासून अशा व्यक्तीवर मकोका लावला जाणार आहे. गोवा राज्याला त्यांच्या राज्यात मद्याचे ‘परमिट’ देण्याचा अधिकार आहे; मात्र महाराष्ट्र राज्यात परमिट देण्याचा अधिकार त्यांना नाही.

गोवा राज्यात अल्प दरात मद्य उपलब्ध होत असल्याने त्याची इतरत्र तस्करी केली जाते. त्यामुळे गोवा राज्य आणि महाराष्ट्र राज्य यांना जोडणार्‍या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्या रस्त्यांवरही तात्पुरत्या स्वरूपातील तपासणी नाकी उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका 

विलंबाने घेतलेला निर्णय असला, तरी ‘हेही नसे थोडके !’