पाण्यासाठी योजना राबवण्यात मनापासून प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस ! – डॉ. राजेंद्रसिंह राणा, विख्यात पर्यावरणतज्ञ

७५ नद्यांच्या परिक्रमा उपक्रमाचा शुभारंभ

डॉ. राजेंद्रसिंह राणा

वर्धा – देशात महाराष्ट्र हे पाण्याविषयी अत्यंत गंभीर असलेले राज्य आहे. नव्याने सत्तेवर येताच फडणवीस यांनी पाणीप्रश्नास प्राधान्य दिले. पाण्याचा गांभीर्याने विचार करून त्यासाठी योजना राबवण्यात मनापासून प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस होय, अशा शब्दांत जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले. ७५ नद्यांच्या परिक्रमा उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बोलतांना डॉ. सिंह यांनी फडणवीसांच्या कामाची प्रशंसा केली.

डॉ. सिंह पुढे म्हणाले की, वर्ष २०१४ मध्ये सत्तेवर येताच फडणवीस यांनी जलयुक्त शिवार ही देशातील पहिली कंत्राटदारमुक्त योजना राबवली, जलसाक्षरता वाढवली. त्या वेळी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट होते; पण फडणवीस सरकारने त्यावर मात केली. लोकसहभागातून यशस्वी ठरलेली ही पहिलीच योजना होय. ‘नदी परिक्रमा’ हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल. उपक्रमाचा आदेश मी वाचला, तो स्तुत्य आहे. संपूर्ण जलबिरादरी या कार्याशी जुळेल.