१. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे महत्त्व हे वाराणसी क्षेत्राहून काकणभर अधिक असणे
‘भुक्तिमुक्तिप्रदं नृणां वाराणस्या यवाधिकम् ।’
– करवीर माहात्म्य, अध्याय २, श्लोक २५
अर्थ : (करवीर क्षेत्र) मनुष्याला ऐहिक सुख आणि मुक्ती प्रदान करणारे असून ते वाराणसीहून जवभर (काकणभर) अधिकच श्रेष्ठ आहे.
‘काशी क्षेत्राहून जवभर सरस असणारे, मनुष्याला ऐहिक सुख आणि मुक्ती देणारे करवीर क्षेत्र इ.स. पूर्व ५ व्या किंवा ६ व्या शतकातील आहे’, असे मानले जाते. श्री महालक्ष्मीची मूर्ती ज्या हिरकखंडमिश्रित रत्नशिलेची बनवली आहे, त्यावरूनही या देवालयाची प्राचीनता सिद्ध होते. तथापि ताम्रपटाचा प्राचीन पुरावा मात्र इ.स. ८७१ मधील आहे. संजाण, जिल्हा ठाणे येथे हा ताम्रपट असून त्यात
महालक्ष्मै स्ववामांगुलिं लोकोपद्रवशान्तये स्म दिशति श्रीवीरनारायणः ।
(राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष प्रथम (वीरनारायण) याचा संजान (ठाणे) येथे सापडलेला ताम्रपट, श्लोक ४७)
अर्थ : श्री वीरनारायणाने लोकांवरील संकट दूर करण्यासाठी स्वतःच्या डाव्या हाताचे बोट श्री महालक्ष्मीला अर्पण केले, असा उल्लेख आहे. याच्या आसपासचे ताम्रपट, शिलालेख आणि पुराणे या देवीचे प्राचीनत्त्व दर्शवतात.
२. प्रमुख साडेतीन शक्तिपिठांपैकी एक पूर्ण पीठ असलेली करवीर निवासिनी महालक्ष्मीदेवी !
त्रिपुरारहस्यातील ज्ञानकांडात भारतातील १२ देवीपिठांचा उल्लेख असून त्यात ‘करवीरे महालक्ष्मीः ।’, असा उल्लेख आहे. इतकेच नव्हे, तर ते प्रमुख साडेतीन शक्तिपिठांपैकी हे एक आहे.
३. करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी आदिशक्ति जगदंबेचे असलेले स्वरूप !
करवीर निवासिनी महालक्ष्मीला आदिशक्ति जगदंबेचे स्वरूप मानले जाते. तिचे वर्णन पुढील श्लोकांत केले आहे.
सर्वस्याद्या महालक्ष्मीस्त्रिगुणा परमेश्वरी ।
लक्ष्यालक्ष्यस्वरूपा सा व्याप्य कृत्स्नं व्यवस्थिता ॥
– मार्कण्डेयपुराण, अध्याय १४, श्लोक ४
अर्थ : त्रिगुणात्मिका देवी महालक्ष्मी ही सर्व विश्वाचे मूळ कारण आहे. ती सगुण आणि निर्गुण असून ती सर्व विश्व व्यापून राहिली आहे.
मातुलिङ्गं गदां खेटं पानपात्रं च बिभ्रती ।
नागं लिङ्गं च योनिं च बिभ्रती नृप मूर्धनि ।।
– मार्कण्डेयपुराण, अध्याय १४, श्लोक ५
अर्थ : हे राजन्, तिने हातात मातुलिंग (महाळुंग नावाचे फळ), गदा, ढाल आणि अमृतपूर्ण पात्र घेतलेले असून मस्तकावर शेषनाग अन् त्याखाली शिवलिंग आणि योनी यांनाही धारण केले आहे.
४. ‘महालक्ष्मी’ शब्दाची व्युत्पत्ती !
अन्तरास्थाय सर्वस्य लक्षयत्यखिलां क्रियाम् ।
अपरिच्छिन्नशक्तिश्च महालक्ष्मीरिति स्मृता ॥ – लक्ष्मीतंत्र
अर्थ : सर्वांच्या आत राहून सर्व कर्मे पहाणारी, अनंत शक्तीसंपन्न जी देवी, ती ‘महालक्ष्मी’ मानली जाते.
तिच्या हातातील आयुधे प्रतीकात्मक असून भुवनेश्वरी संहितेत त्याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे.
१. मातुलिंग : कर्मसमूह
२. गदा : इच्छाशक्ती
३. खेट (ढाल) : ज्ञानशक्ती
४. पानपात्र (ज्ञानामृताचे पात्र) : तुर्यावस्था (ज्ञानाशी संबंधित चार अवस्था)
५. लिंग : पुरुष
६. योनी : प्रकृती
७. नाग : काल
याशिवाय ‘नाग म्हणजे ब्रह्मा, लिंग म्हणजे शिव आणि योनी म्हणजे विष्णु’, असाही या प्रतीकांचा अर्थ लावून ही देवी ब्रह्मविष्णुशिवात्मक असल्याचेही प्रतिपादन केले आहे.
५. करवीर निवासिनी महालक्ष्मीचे माहात्म्य !
५ अ. नवसाला पावणारी : ‘ही देवी नवसाला पावणारी आहे’, असे अनेक उपलब्ध कागदपत्रांवरून सिद्ध होते. अनेक राजेरजवाड्यांनी नवस करून आपले मनोरथ पूर्ण झाल्यावर तो नवस फेडल्याचे उल्लेख कागदपत्रांत आहेत.
५ आ. ‘श्रीविष्णु येथे महालक्ष्मीरूपाने राहिला आहे’, असे मानले जाणे आणि तिच्या सभोवती अनेक देवतांची पवित्र स्थाने असणे : ‘करवीरक्षेत्राला ‘महामातृक’ म्हणतात. येथे श्रीविष्णु महालक्ष्मीरूपाने राहिला आहे. या क्षेत्री पंचगंगा ही मुख्य नदी आहे. कश्यपादिमुनींनी तिला महत्प्रयत्नांनी येथे आणली. आदिशक्तीचे हे मुख्य पीठ ! तिच्या दोन्ही बाजूंनी जयंती आणि जिवंती या दोन नद्या देवीला प्रदक्षिणा घालून एकमेकींना भेटतात. देवीच्या ८ दिशांना ८ शिवलिंगे आहेत. शेषशायी महाविष्णु चारही महाद्वारांचे रक्षण करत आहे. वायव्येला प्रयाग असून रुद्रपद, हाटकेश्वर, विशालतीर्थ आहे. देवालयाच्या जवळच रंकभैरवाचे देवालय आहे. नैऋत्येला नंदवाळ क्षेत्री पांडुरंग आहे. पूर्वेकडे उज्ज्वलांबादेवी (उजळाईदेवी) असून पश्चिमेस सिद्धबटुकेश आणि दक्षिणेस कात्यायनीदेवी आहे. उत्तरेस रत्नेश्वर आणि त्र्यंबुली (टेंबलाई) आहे.
५ इ. हे मंदिर अतिशय प्राचीन असून त्याची रचना सर्वतोभद्र चक्रावर, म्हणजे एका विशिष्ट तंत्रशास्त्रीय आकारात केलेली असणे : उपलब्ध शिलालेखावरून हे देवालय इ.स.च्या पहिल्या किंवा दुसर्या शतकातील असल्याचे सिद्ध होते. संपूर्ण देवालय काळ्याभोर दगडाचे असून बांधकामासाठी चुना किंवा सिमेंट वापरलेले नाही. देवालयात अगणित खांब असून दाराखेरीज कुठेही लाकूड वापरलेले नाही. देवालयाची रचना तीन गाभार्यांची आहे. हे मंदिर सर्वतोभद्र चक्रावर (एक विशिष्ट तंत्रशास्त्रीय आकार) उभारले आहे.
५ ई. मुसलमानांच्या आक्रमणांपासून देवीची मूर्ती वाचवण्यासाठी ती लपवून ठेवणे, नंतर १७ व्या शतकात तिची पुन्हा स्थापना करण्यात येणे : दक्षिणेत मुसलमानांच्या स्वार्या होऊ लागल्या. तेव्हा श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती कपिलतीर्थानजिक एका पुजार्याच्या घरात लपवून ठेवली होती. सतराव्या शतकाच्या अखेरीस ही मूर्ती पुन्हा सदर देवालयात स्थापन करण्यात आली. सध्या नवरात्रीत येथे भव्य उत्सव साजरा केला जातो.
५ उ. जैन धर्मीय महालक्ष्मीला ‘पद्मावती’ मानून तिची भक्ती करत असणे : आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील अनेक लोक तिचे भक्त आहेत. जैन धर्मियांपैकी काही लोक ‘त्यांच्या पुराणातील ही श्री पद्मावतीदेवी आहे’, असे मानतात आणि तिची भक्ती करतात.
५ ऊ. ‘तिरुपती बालाजीच्या दर्शनानंतर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यावरच तिरुपतीचे दर्शन पूर्ण झाले’, असे मानले जाणे : ‘तिरुपती बालाजीच्या दर्शनानंतर जोपर्यंत करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले जात नाही, तोपर्यंत तिरुपतीचे दर्शन पूर्ण होत नाही’, अशी तिरुपती येथील लोकांची श्रद्धा आहे. प्रतिवर्षी नवरात्रीत ‘तिरुपती’ देवस्थानातून श्री महालक्ष्मीसाठी महावस्त्र (शालू) पाठवण्यात येते.’
(साभार : ‘गीता मंदिर पत्रिका’)