परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील श्रीदुर्गादेवीच्या चित्राच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन आणि त्याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना चांगले आरोग्य लाभावे, यासाठी ऑक्टोबर २०२१ मध्ये शारदीय नवरात्रीत आणि जानेवारी २०२२ मध्ये शाकंभरी नवरात्रीत परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत श्रीसप्तशतीपाठ करण्यात आला. त्यांच्या देवघरातील श्रीदुर्गादेवीच्या चित्राची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना :

‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील श्रीदुर्गादेवीच्या चित्राची केलेली ‘यू.ए.एस्.’ निरीक्षणे

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.

१. श्रीदुर्गादेवीच्या चित्रामध्ये ११.९.२०२१ या दिवशी नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे आणि तिची प्रभावळ १६०.४५ मीटर आहे.

सौ. मधुरा कर्वे

१ अ. विश्लेषण – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील देवतेचे प्रत्येक चित्र आणि मूर्ती यांमध्ये देवतांचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाले असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये देवदेवतांप्रती पुष्कळ भक्ती आहे आणि त्यांच्या खोलीतील देवघरातील देवतांची पूजा करणार्‍या साधिकेमध्ये देवतांप्रती पुष्कळ भाव आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सर्व देवतांची चित्रे आणि मूर्ती यांमध्ये देवतांचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाले आहे. त्यामुळे त्यांच्या देवघरातील देवतेचे प्रत्येक चित्र किंवा मूर्ती पुष्कळ प्रमाणात जागृत झालेले आहेत.

१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवलेल्या श्रीदुर्गादेवीच्या चित्रातून आवश्यकतेनुसार तारक किंवा मारक स्वरूपाची शक्ती प्रक्षेपित होणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवलेल्या श्रीदुर्गादेवीच्या चित्रातून आवश्यकतेनुसार तारक किंवा मारक स्वरूपाची शक्ती  वातावरणात प्रक्षेपित होते. श्रीदुर्गादेवीच्या चित्रातून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा कार्यरत झाल्यामुळे ‘यू.ए.एस्.’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे तिची चाचणी केल्यावर त्यातून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जेची प्रभावळे कार्यरत झाल्याचे चाचणीतील निरीक्षणात आढळून आले.

२. शारदीय नवरात्रीच्या वेळी नवरात्रीतील पहिले २ दिवस श्रीदुर्गादेवीच्या चित्रामध्ये काही प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली. शारदीय नवरात्रीचे पहिले दोन दिवस सोडून नंतरच्या प्रत्येक दिवशी देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर पुष्कळ प्रमाणात वाढ झाली. नवरात्रीच्या ९ व्या दिवशी (१५.१०.२०२१ या दिवशी) देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक, म्हणजे ७८२.४२ मीटर झाली.

कु. मधुरा भोसले

२ अ. विश्लेषण – नवरात्रीतील पहिले २ दिवस श्रीदुर्गादेवीच्या चित्रामध्ये काही प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळण्यामागील अध्यात्मशास्त्र : शारदीय नवरात्रीच्या पहिल्या २ दिवसांमध्ये श्रीदुर्गादेवी इच्छाशक्तीच्या बळावर वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढत होती. तेव्हा पाताळातील वाईट शक्ती पृथ्वीवरील सात्त्विक जिवांवर सूक्ष्मातून आक्रमणे करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत होत्या. तेव्हा वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांपासून साधकांचे रक्षण करण्यासाठी श्रीदुर्गादेवीने साधकांवर सोडलेली त्रासदायक काळी शक्ती स्वत:कडे खेचून घेतली. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या २ दिवसांत श्रीदुर्गादेवीच्या चित्रात काही प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली.

२ आ. नवरात्रीच्या कालावधीत पृथ्वीवर देवीचे तत्त्व सहस्रपटींनी कार्यरत होणे : नवरात्रीच्या कालावधीत देवीच्या लोकातून पृथ्वीकडे देवीचे तत्त्व अन्य दिवसांच्या तुलनेत सहस्र पटींनी येते. त्यामुळे पृथ्वीवर नवरात्रीच्या कालावधीत देवीच्या विविध रूपांची उपासना केल्यावर त्यांचे पूजेत ठेवलेले चित्र किंवा मूर्ती यांमध्ये संबंधित देवीचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात आकृष्ट होते. हे तत्त्व पहिल्या दिवसापासून नवव्या दिवसापर्यंत उत्तरोत्तर वाढत जाते.

२ इ. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच्या तुलनेत नवव्या दिवशी देवीचे निर्गुणतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत झाल्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच्या तुलनेत नवव्या दिवशी सप्तशतीपाठातील पूजेमध्ये ठेवलेल्या श्रीदुर्गादेवीच्या चित्रामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळणे : देवीच्या चित्रामध्ये पहिल्या तीन दिवसांमध्ये इच्छाशक्ती, मधल्या तीन दिवसांमध्ये क्रियाशक्ती आणि शेवटच्या तीन दिवसांमध्ये ज्ञानशक्ती कार्यरत झाली होती. इच्छाशक्ती सूक्ष्म, क्रियाशक्ती सूक्ष्मतर आणि ज्ञानशक्ती सूक्ष्मतम स्तरावर कार्यरत असते. इच्छाशक्तीच्या तुलनेत क्रियाशक्तीमध्ये आणि क्रियाशक्तीच्या तुलनेत ज्ञानशक्तीमध्ये देवीचे निर्गुण स्तरावरील तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच्या तुलनेत नवव्या दिवशी देवीच्या चित्रामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा कार्यरत झाली होती.

२ ई. नवरात्रीच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये श्रीसप्तशतीपाठाच्या पूर्वी देवीच्या चित्रात नकारात्मक ऊर्जा आढळणे आणि पाठानंतर ती न्यून होणे किंवा न आढळणे यांच्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव : मार्कण्डेय ऋषींनी देवीच्या ‘श्रीसप्तशतीपाठा’ची रचना अत्यंत भक्तीने केलेली आहे. या पाठामध्ये ७०० श्लोक असून त्यामध्ये देवीच्या विविध रूपांचे, तिचे असुरांशी झालेल्या युद्धाचे आणि पराक्रमाचे, तसेच तिच्यातील विविध गुणवैशिष्ट्यांचे सुंदर वर्णन केले आहे. नवरात्रीमध्ये श्रीसप्तशतीपाठ भावूपर्णरित्या वाचल्यामुळे पुरोहितांकडून प्रक्षेपित झालेल्या भावलहरींचा सूक्ष्म स्पर्श देवीच्या पाठातील प्रत्येक अक्षराला होऊन त्यामध्ये सुप्त अवस्थेत असलेली श्रीदुर्गादेवीची शक्ती प्रगट होऊन कार्यरत होते. यालाच ‘भक्ताच्या भक्तीने देवत्व जागृत करणे’, असे म्हणतात. नवरात्रीच्या कालावधीत सनातनच्या साधक पुरोहितांनी भावपूर्णरित्या श्रीसप्तशतीपाठ केल्यामुळे त्यातून आकाशतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत झालेली श्रीदुर्गादेवीची ज्ञानशक्ती पूजेतील श्रीदुर्गादेवीच्या चित्रामध्ये संक्रमित झाली आणि चित्रातून तेजतत्त्वाच्या स्तरावर वायूमंडलात प्रक्षेपित झाली. त्यामुळे नवरात्रीच्या कालावधीत पूजेतील देवीचे चित्र देवीतत्त्वाने उत्तरोत्तर भारित होऊन ९ व्या दिवशी सर्वाधिक प्रमाणात भारित होऊन जागृत झाले. यावरून देवतांशी संबंधित असणारे ग्रंथ किंवा पोथी यांचे भावपूर्णरित्या वाचन करणे किंवा त्यांचे मंत्र, श्लोक किंवा स्तोत्र भावपूर्णरित्या म्हणणे, यांचे महत्त्व लक्षात येते.

वरील कारणांमुळे परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीमध्ये श्रीसप्तशतीपाठाच्या वेळी पूजेत ठेवलेल्या श्रीदुर्गादेवीच्या चित्राचे नवरात्रीच्या पहिल्या दोन दिवसांचे आणि पुढील ७ दिवसांचे ‘यू.ए.एस्.’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेल्या चाचणीतील निरीक्षणांमध्ये पुष्कळ प्रमाणात भेद दिसत आहे.

३. १८.१.२०२२ या दिवशी शाकंभरी नवरात्रीनिमित्त केलेल्या श्रीसप्तशतीपाठातील पूजनात ठेवलेल्या श्रीदुर्गादेवीच्या चित्रामध्ये, तसेच पूजेतील अन्य घटकांमध्येही पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली.

३ अ. विश्लेषण – वर्ष २०२२ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर वाईट शक्तींनी सगुण स्तरावर केलेली आसुरी आक्रमणे शाकंभरी नवरात्रीनिमित्त केलेल्या श्रीसप्तशतीपाठातील पूजनात ठेवलेल्या श्रीदुर्गादेवीच्या चित्राने स्वतःवर झेलल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे मोठे संकट टळणे आणि श्रीदुर्गादेवीच्या चित्रामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळणे : वर्ष २०२१ च्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये सूक्ष्मातील युद्धाची तीव्रता अधिक प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे पाताळ आणि नरक येथील मोठ्या वाईट शक्तींशी लढण्यासाठी ब्रह्मांडातील विविध उच्च आणि दैवी लोकांमध्ये निवास करणार्‍या दैवी शक्ती पुष्कळ प्रमाणात सक्रीय झाल्या आहेत. या सूक्ष्म युद्धाच्या अंतर्गत ‘विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून पृथ्वीवरील रज-तम नष्ट होऊन येथे सत्त्वप्रधान आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ नये’, यासाठी जानेवारी २०२२ मध्ये पुष्कळ प्रमाणात सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आक्रमणे झाली. त्या वेळी तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडलीतील चंद्र, मंगळ आणि शनि, तर गोचर कुंडलीतील रवि, बुध अन् शनि हे ग्रह दूषित असल्याने ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या महामृत्यूयोगासाठी कारणीभूत होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर महामृत्यूयोगाचे मोठे संकट आले होते. हे संकट स्थुलातून स्थळाच्या स्तरावर सगुण आणि काळाच्या स्तरावर निर्गुण स्तरावरील होते. या महामृत्यूयोगाच्या संकटापासून परात्पर गुरुदेवांचे रक्षण करण्यासाठी शिवाने श्रीदुर्गादेवीची शक्ती त्यांच्याकडे प्रक्षेपित केली होती. या सूक्ष्म युद्धामध्ये काळाच्या स्तरावरील म्हणजे, निर्गुण स्तरावरील सूक्ष्मातील आक्रमणे शिवाच्या ‘मृत्यूंजय’ या रूपातून प्रक्षेपित झालेल्या निर्गुण चैतन्यामुळे नष्ट झाली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सूक्ष्मातील वाईट शक्तींनी स्थळाच्या स्तरावरील, म्हणजे सगुण स्तरावरील सूक्ष्मातून आसुरी आक्रमणे शाकंभरी नवरात्रीनिमित्त केलेल्या श्रीसप्तशतीपाठातील पूजनात ठेवलेल्या श्रीदुर्गादेवीच्या चित्राने स्वत:वर झेलल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे मोठे संकट टळले. त्यामुळे देवीच्या चित्रामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली.

३ आ. पूजेतील अन्य घटकांमध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळण्याचे कारण : श्रीदुर्गासप्तशतीपाठाच्या वेळी पूजेमध्ये ठेवलेल्या विविध घटकांमध्ये मुळात सात्त्विकता आहे. त्यामुळे त्यांच्यातील सात्त्विकतेवर त्रासदायक आवरण निर्माण करण्यासाठी ५ व्या पाताळातील देवीची तांत्रिक मार्गाने उपासना करणार्‍या बलाढ्य आसुरी शक्तींनी पुष्कळ प्रमाणात त्रासदायक शक्ती सोडली. त्यामुळे पूजासाहित्य आणि पूजेशी संबंधित असणार्‍या प्रत्येक घटकावर पुष्कळ प्रमाणात त्रासदायक शक्तीचे आवरण आले.’

४. श्रीदुर्गादेवीच्या चित्राच्या संदर्भातील या लेखातून शिकायला मिळालेली सूत्रे

४ अ. देवघरातील देवतांची पूजा भक्तीभावाने केली, तर देवतांची चित्रे किंवा मूर्ती यांमध्ये देवतेचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात आकृष्ट होते.

४ आ. सूक्ष्म युद्धाच्या तीव्रतेनुसार देवघरातील देवतांच्या जागृत झालेल्या चित्रातून किंवा मूर्तीतून आवश्यकतेनुसार तारक किंवा मारक शक्ती प्रक्षेपित होते.

४ इ. हिंदु धर्मामध्ये सांगितलेल्या देवतेच्या विशिष्ट सणाच्या वेळी संबंधित देवतेचे तत्त्व सहस्रपटींनी पृथ्वीवर येते. त्यामुळे देवघर किंवा पूजास्थळी किंवा यज्ञस्थळी ठेवलेले संबंधित देवतेचे चित्र किंवा मूर्ती यांमध्ये संबंधित देवतेचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत होते.

४ ई. देवतेशी संबंधित असणार्‍या धर्मग्रंथाचे भावपूर्णरित्या वाचन केल्यावर त्यामध्ये सुप्तावस्थेत असणारी देवतेची शक्ती आणि चैतन्य जागृत होऊन कार्यरत होते.

४ उ. विशिष्ट देवतेच्या सणाच्या वेळी संबंधित देवतेची उपासना केल्यावर उपासकावर संबंधित देवतेची कृपा होऊन त्याच्यावरील स्थूल किंवा सूक्ष्म स्तरावरील संकट दूर होते.

वरील निष्कर्षावरून देवघरातील देवतांचे पूजन आणि देवतांच्या संबंधित सणांच्या वेळी केलेली देवतांची उपासना भावपूर्णरित्या करण्याचे महत्त्व लक्षात येते.

५. कृतज्ञता : श्रीगुरूंच्या कृपेमुळे ‘नवरात्रीच्या कालावधीत देवीचे तत्त्व कसे कार्यरत असते अन् देवता कशाप्रकारे वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढून साधक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रक्षण करतात’ ही सूत्रे शिकायला मिळाली, यासाठी मी श्रीदुर्गादेवी अन् श्रीगुरु यांच्या पावन चरणी कृतज्ञ आहे.’

संकलक : सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१३.२.२०२२)

ई-मेल : [email protected]

सूक्ष्म-परीक्षण : कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.२.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक