नागपूर – नागपूर माहिती आयोगाने ३७ सहस्र प्रकरणांना न्याय देऊन ती निकाली काढली आहेत. यातील ९ सहस्र प्रकरणांचे निर्णय एका वर्षात घेण्यात आले आहेत. २५ टक्के निर्णय वर्षभरात दिल्याने कामाचा निपटारा करण्यात मोठे साहाय्य झाले आहे, असे प्रतिपादन राज्य माहिती आयोगाचे नागपूर खंडपिठाचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी येथे केले. माहिती आयोगाच्या नागपूर खंडपिठाने २९ सप्टेंबर या दिवशी ‘माहिती अधिकार दिवस’ साजरा केला. त्या वेळी ते बोलत होते.
पांडे म्हणाले की, माहिती अधिकार कायदा नागरिकांच्या हितासाठी आणण्यात आला आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दरी मिटवणारा असा हा कायदा आहे. त्याची प्रभावी कार्यवाही होणार आहे. माहिती अधिकार कायद्याचा कुणी दुरुपयोग करत असेल, तर त्याला चाप लावावा. त्याविषयी तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले.