रात्रीच्या जागरणाचा त्रास होऊ नये, यासाठी हे करा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ६५

वैद्य मेघराज पराडकर

‘कधी सेवेनिमित्त रात्री जागरण करावे लागते. रात्रीचे जेवण लवकर झाल्याने जागरण झाल्यावर भूक लागते. अशा वेळी शेव, चिवडा यांसारखे फराळाचे पदार्थ खाऊ नका. जागरण होते तेव्हा पोटामध्ये पित्त वाढलेले असते. अशा वेळी फराळाचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने पित्ताचा भडका उडेल. शरीर स्वतःला सुस्थितीत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते. त्यामुळे पित्ताचा भडका उडाला, तरी एखाद्या दिवशी याचे दुष्परिणाम दिसणार नाहीत; परंतु वारंवार असे करत असाल, तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याविना रहाणार नाही. जागरण होते, तेव्हा पित्ताचा त्रास होऊ नये, यासाठी स्वतःजवळ तुपाची बरणी ठेवा आणि रात्री अवेळी भूक लागेल तेव्हा भुकेच्या प्रमाणानुसार १ ते ४ चमचे तूप चघळून खा. निवळ तूप खाणे कठीण वाटत असेल, तर तुपात थोडी साखर किंवा गूळ घालून खाल्ले, तरी चालेल. तूप पचण्यासाठी त्यावर अर्धी वाटी गरम पाणी प्या. (तूप मोजण्यासाठी चहाचा चमचा वापरा. १ ते ४ चमचे हे पातळ तुपाचे प्रमाण आहे. त्यामुळे तूप थिजलेले असल्यास त्या अनुमानाने घ्या.)

वाढलेल्या पित्ताला शांत करण्याचा हा सर्वांत प्रभावी उपाय आहे; परंतु ‘अनावश्यक जागरण टाळणे’, हा मूलगामी उपाय आहे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.९.२०२२)