‘सुर-ताल हुनर का कमाल’, या नृत्य स्पर्धेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने भाग घेतल्यावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. अपाला औंधकर हिला जाणवलेली सूत्रे

‘सुर-ताल हुनर का कमाल’, या नृत्य स्पर्धेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने भाग घेतल्यावर ‘नृत्य हे कुणाशी स्पर्धा करण्यासाठी करायचे नसून त्यातून देवाला अनुभवण्याचा आंतरिक आनंद घ्यायचा आहे’, या संदर्भात ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) हिला जाणवलेली सूत्रे

कु. अपाला औंधकर ही ‘भरतनाट्यम्’ हा नृत्य प्रकार शिकते. अन्य मुलींप्रमाणे पूर्वी ती नृत्यांच्या विविध स्पर्धांत भाग घ्यायची. आता ती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात साधना करत आहे. तेव्हा तिला ‘कुठलीही कला हे ईश्वरप्राप्तीचे एक सुंदर माध्यम आहे’, याची जाणीव झाली. तिने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘सुर-ताल हुनर का कमाल’ या नृत्य स्पर्धेत भाग घेतल्यावर ‘आपले नृत्य देवाचरणी समर्पित करायचे आहे’, या भावाने प्रयत्न केले. त्यातून तिला आंतरिक आनंद अनुभवता आला. तेव्हा व्यावहारिकदृष्ट्या केलेले नृत्य आणि आध्यात्मिक दृष्टीने केलेले नृत्य यांतील भेद तिच्या लक्षात आला.

नृत्यसाधना

१. अन्य नृत्य स्पर्धांत भाग घेतल्यावर जाणवलेली सूत्रे

१ अ. अन्य नृत्य स्पर्धांत भाग घेतल्यावर ‘वरचा क्रमांक यावा’ आणि ‘स्वतःचे वेगळेपण दिसावे’, याकडे अधिक लक्ष असणे : ‘मी रत्नागिरी येथे असतांना अनेक वेळा विविध नृत्यांच्या स्पर्धांत भाग घेतला होता. तेव्हा मी केवळ स्पर्धेसाठी म्हणून सराव करायचे. तेव्हा ‘माझा या स्पर्धेत वरचा क्रमांक यावा’, असे मला वाटायचे. नृत्यासाठी सिद्धता करतांना माझे सगळे लक्ष ‘शृंगार आणि माझे नृत्य अजून चांगले कसे होईल ?’, यांकडेच अधिक असायचे. ‘मी केलेला शृंगार सर्वांपेक्षा निराळा आणि उठून दिसणारा हवा’, असेही मला वाटायचे.

१ आ. अतीआत्मविश्वास असणे आणि स्पर्धेमध्ये वरचा क्रमांक न आल्यावर नकारात्मकता वाढणे : माझ्या मनात ‘स्पर्धेच्या वेळी माझे नृत्य चांगलेच होणार’, असा अतीआत्मविश्वास (७० टक्के) असायचा. त्यामुळे त्या स्पर्धेत माझा वरचा क्रमांक आला नाही, तर मला वाईट वाटून माझ्या मनात नकारात्मक विचार यायचे आणि नंतर मला कुठल्याच गोष्टीत रस वाटायचा नाही.

१ इ. नृत्याचा सराव करतांना इतरांच्या सूचना न ऐकणे, ‘स्वतःचे योग्यच आहे’, अशी विचारप्रक्रिया असणे आणि नृत्यात भाव ठेवण्याचा प्रयत्न नसणे : माझे नृत्य अजून चांगले होण्यासाठी कुणी मला काही सुचवल्यास ते मला मनापासून पटायचे नाही. माझ्यातील अहंमुळे माझ्या मनात विकल्प येऊन ‘माझेच योग्य आहे’, असे मला वाटायचे. मला नृत्याचा सराव करतांना कंटाळा यायचा आणि निरुत्साह असायचा. ‘माझे नृत्य गुरुचरणांपर्यंत पोचावे’, यासाठी माझ्याकडून भावाच्या स्तरावर काहीच प्रयत्न केले जायचे नाहीत. त्यामुळे माझे नृत्य चांगले व्हायचे नाही.

१ ई. स्पर्धेतून शिकण्याची वृत्ती नसणे आणि आईवर विनाकारण चिडचिड होणे : मला या स्पर्धांविषयी जवळीकता वाटायची नाही. माझा त्यातून शिकण्याचा भागही पुष्कळ अल्प असायचा. मला स्पर्धास्थळी वातावरणात दाब आणि ताण जाणवायचा. त्यामुळे मला उत्साह नसायचा. स्पर्धेच्या दिवशी नृत्याची सिद्धता करतांना मला रडू यायचे. मी शृंगार करतांनाही ईश्वराप्रती भाव ठेवायचे नाही. तेव्हा मी विनाकारण रडायचे आणि आईवर चिडचिड करायचे. मी स्पर्धेत भाग घेतलेल्या अन्य मैत्रिणींशी तुलना करायचे.

२. ‘सुर-ताल हुनर का कमाल’ या नृत्य स्पर्धेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने भाग घेतल्यावर मनाच्या स्तरावर झालेले पालट आणि केलेले प्रयत्न 

कु. अपाला औंधकर

२ अ. ‘हे नृत्य देवाच्या अनुसंधानात रहाण्यासाठी आणि देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी करायचे आहे’, याची जाणीव होऊन गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने नृत्य स्पर्धेत भाग घेतल्यावर माझ्या मनातील स्पर्धेविषयीच्या दृष्टीकोनात पालट झाला. मी या स्पर्धेत भाग घेतला असला, तरी ‘मला हे नृत्य देवाच्या अनुसंधानात रहाण्यासाठी आणि देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी करायचे आहे’, याची जाणीव होऊन माझी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘गुरुदेवांनी माझे नृत्य पहाणे’, यातच मला खरा आनंद आहे’, असे वाटून माझी क्षणोक्षणी कृतज्ञता व्यक्त होत होती.

२ आ. ‘गुरुदेवच नृत्य करवून घेणार आहेत’, असा भाव ठेवल्यावर शरणागतभाव निर्माण होणे, पुष्कळ आनंद मिळून कृतज्ञता व्यक्त होणे : ‘सुर-ताल हुनर का कमाल’ या नृत्य स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाल्यावर ‘ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा असून तेच सर्वकाही करवून घेणार आहेत’, असा भाव मी मनात ठेवला होता. त्यामुळे नृत्य शरणागतभावाने बसवले गेले. मला पुष्कळ आनंद होत होता आणि माझी अखंड कृतज्ञता व्यक्त होत होती. मी कितीही वेळा नृत्याचा सराव केला, तरी मला कंटाळा यायचा नाही किंवा मी थकायचेही नाही. माझी कुणावरही चिडचिड झाली नाही. जणू मी ‘गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्तच्या भावसोहळ्यात त्यांच्यासमोर नृत्य करत आहे’, असे मला वाटायचे.

२ इ. शिकण्याच्या स्थितीत रहाता आल्यामुळे झालेले लाभ !

१. ‘माझी आई आणि कु. तेजल पात्रीकर (समन्वयक, संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय) मला नृत्य अजून भावपूर्ण होण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हे सांगतांना साक्षात् गुरुदेवच मला त्यांच्या माध्यमातून शिकवत आहेत’, असे वाटून माझ्याकडून ते स्वीकारले जायचे आणि तसे प्रयत्नही व्हायचे.

२. माझ्यासह अजून ३ साधिकांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने या स्पर्धेत भाग घेतला होता. मी त्यांच्याशी कधीच तुलना केली नाही. मला त्यांच्याकडूनही शिकता आले. मी नृत्याचा सराव शिकण्याच्या स्थितीत राहून केल्यामुळे मला त्यातून आनंदही घेता आला.

३. नृत्याचे चित्रीकरण करतांना भावाच्या स्तरावर केलेले प्रयत्न  !

अ. ‘सुर-ताल हुनर का कमाल’ या स्पर्धेच्या वेळी परिधान करायचा पोषाख आणि अलंकार मी स्पर्धेच्या आदल्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये घालून ठेवले होते.

आ. ‘मी सर्व देवतांसमोर नृत्य करणार आहे’, असा भाव माझ्यात निर्माण होऊन ‘कधी एकदा मी नृत्य सादर करते’, असे मला झाले होते.

इ. स्पर्धेचे चित्रीकरण होतांना माझ्याकडून सतत प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होत होती.

या प्रयत्नांमुळे मला गुरुदेव आणि गणपति यांचे अस्तित्व जाणवत होते. नृत्य करून झाल्यावर मला एक वेगळा आनंद अनुभवता आला आणि पुष्कळ चैतन्य मिळाले.

४. स्पर्धेतील परीक्षक आणि समन्वयक यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे

४ अ. स्पर्धेच्या समन्वयकांनी मोकळेपणाने बोलणे : आम्हाला या स्पर्धेविषयी फारसे ठाऊक नव्हते; म्हणून आम्ही या स्पर्धेच्या एका समन्वयकांशी बोललो. त्यांनी सहजतेने आणि मोकळेपणाने आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

४ आ. स्पर्धेच्या संयोजक डॉ. रेखा मेहरा यांनी ‘ऑनलाईन’ नृत्य स्पर्धा प्रक्रिया समजावून सांगणे आणि त्यांनी ‘स्पर्धेसाठी पुष्कळ परिश्रम घेतले आहेत’, असे जाणवणे : स्पर्धेच्या संयोजक डॉ. रेखा मेहरा यांनी आम्हाला भ्रमणभाष करून ‘तुमचे नृत्य कधी पहायला मिळेल ?’, असे विचारले. त्यांनी आम्हाला ‘ऑनलाईन’ नृत्य स्पर्धा प्रक्रिया’ समजावून सांगितली. ही ‘स्पर्धा ‘ऑनलाईन’ असली’, तरी त्यांनी त्यासाठी पुष्कळ परिश्रम घेतले आहेत’, हे त्यांच्या एकंदरीत सिद्धतेवरून लक्षात आले.

५. भाव ठेवून नृत्य करतांना प्रथमच गणपतीचे विनायक रूपातील दर्शन होऊन भाव जागृत होणे

मी स्पर्धेच्या वेळी श्री गणपतीच्या ‘श्री विनायक’ रूपाचे वर्णन असणार्‍या गाण्यावर नृत्य केले. तेव्हा मला प्रथमच गणपतीचे श्री विनायक रूपातील दर्शन होऊन माझा भाव जागृत झाला. मला हे केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे अनुभवता आले.

६. गुरुदेवांच्या कृपेमुळे ‘ईश्वर प्राप्तीसाठी केलेले नृत्य’ आणि ‘मनोरंजनासाठी केलेले नृत्य’ याचा अभ्यास करता येणे

केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे मला या स्पर्धेत भाग घेता आला. त्यांनीच माझ्याकडून सर्वकाही करवून घेतले. त्यांच्या संकल्पाने मला ‘ईश्वरप्राप्तीसाठी केलेले नृत्य’ आणि ‘मनोरंजनासाठी केलेले नृत्य’, याचा तुलनात्मक अभ्यास करता आला. मला ‘या संकल्पाचा एक छोटा भाग होता आले’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

७. कृतज्ञता

गुरुदेवांनी या स्पर्धेतून ‘मला कुणाशी स्पर्धा करायची नसून नृत्यामधून देवाला अनुभवायचे आहे’, हे शिकवले. ‘गुरुदेवांनी माझे नृत्य पाहिले’, यातच मला पुष्कळ आनंद मिळाला. गुरुदेवांची दृष्टी आपल्यावर पडणे, म्हणजे आपण भवसागरातून तरून जाणे होय ! त्यांची प्रीती अनुभवता येणे, म्हणजे सर्वकाही मिळाल्यासारखेच आहे. मला या स्पर्धेच्या वेळी त्यांची प्रीती अनुभवता आली. गुरुदेव प्रत्यक्षात समोर नसूनही मला त्यांच्याशी सूक्ष्मातून बोलता आले. गुरुदेवांनी मला सर्वकाही दिले आहे. मी त्यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. अपाला अमित औंधकर (वय १५ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), गोवा (८.२.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.