बागा, कळंगुट येथे बांगलादेशी चालवत आहेत उपाहारगृह !

कळंगुट पोलीस कारवाई करणार

म्हापसा, २७ सप्टेंबर (वार्ता.) – बागा, कळंगुट येथे एक बांगलादेशी महिला आणि तिचा १८ वर्षांचा मुलगा ‘झायका’ हे एक उपाहारगृह चालवत आहेत. याविषयी माहिती मिळाल्यानंतर कळंगुट पोलिसांनी या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यास आरंभ केला आहे.

आधीच्या २ वर्षांच्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये बांगलादेशी घुसखोरांना कह्यात घेण्याचे प्रमाण दुप्पट

गोव्यात वर्ष २०२० मध्ये ५, वर्ष २०२१ मध्ये १० आणि वर्ष २०२२ मध्ये मागील १०० दिवसांतच २३ बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे, अशी माहिती शासकीय आकडेवारीतून मिळाली आहे. आतापर्यंत गोव्यात एकूण ५६ बांगलादेशी घुसखोर गोव्यात अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे. बांगलादेशी घुसखोरांसमवेत असलेल्या लहान मुलांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. यामधील ६ मुलांना परत मायदेशी पाठवण्यात आले, तर २ मुले पसार झाली आहेत. (अशा प्रकारे पसार होणार्‍यांना कसे शोधून काढणार ? ही मुले मोठी झाल्यावर भारतीय म्हणूनच वावरणार. त्यामुळे काहीतरी कारवाई होणे आवश्यक वाटते ! – संपादक)  विदेशी विभागीय नोंदणी कार्यालयाचे पोलीस अधीक्षक बॉस्को जार्ज म्हणाले, ‘‘सध्या कह्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांना मायदेशी पाठवण्यासाठी विदेशी विभागीय नोंदणी कार्यालयाने (एफ्.आर्.आर्.ओ.ने) कायदेशीर प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. त्यांना स्थानबद्धता केंद्रात (डिटेंशन सेंटर) ठेवण्यास अडचण असल्याने त्यांना घरी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.’’


स्थानबद्धता केंद्राच्या देखभालीकडे शासनाचे दुर्लक्ष

पणजी – राज्यात बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधातील कारवाई सध्या ऐरणीवर आहे; मात्र अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या विदेशी नागरिकांना ठेवण्यासाठी असलेल्या स्थानबद्धता केंद्राची स्थिती बिकट झाल्याने कह्यात घेण्यात येत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांना ते रहात असलेल्याच घरी नजरकैदेत ठेवले जात आहे. (यामुळे पोलिसांवर अतिरिक्त सेवेचा ताण येण्यासमवेतच पोलिसांचे लक्ष चुकवून हे बांगलादेशी पसार होण्याची शक्यताही अधिक संभवते ! – संपादक)
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात वर्ष २०१९ मध्ये अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या विदेशी नागरिकांसाठी राज्यात म्हापसा येथे स्थानबद्धता केंद्र चालू करण्यात आले. या केंद्राच्या देखभालीचे दायित्व शासनाच्या सामाजिक कल्याण विभागाचे आहे. येथील शौचालयांची स्थिती बिकट झाली आहे, खाण्यापिण्याचीही येथे योग्य सोय नाही आणि खाटांचीही कमतरता आहे. नोव्हेंबर २०२० पासून या ठिकाणी केंद्राच्या देखभालीसाठी अधीक्षक नेमण्यात आलेला नाही, तर २ अन्य कर्मचारी या ठिकाणी कामाला येत नाहीत. पावसाळ्यात केंद्रातील काही भागात पाणी गेल्याने येथे ‘क’ गटातील कर्मचारी काम करण्यास नकार देत आहेत. केंद्राच्या दुरवस्थेविषयी विदेशी विभागीय नोंदणी कार्यालयाने (एफ्.आर्.आर्.ओ.ने) अनेक वेळा सामाजिक कल्याण विभागाला कळवूनही देशभालीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. समाज कल्याण खात्याच्या संचालिका संध्या कामत या आरोपाचे खंडन करतांना म्हणाल्या, ‘‘केंद्रात रहाणार्‍यांना जेवण स्वत: करण्याची सुविधा दिलेली असल्याने केंद्रातून अन्नपुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याचा आरोप खोटा आहे. केंद्राच्या इमारतीची डागडुजी करणे आणि नूतनीकरण करणे आवश्यक आहे. केंद्रासाठी अधीक्षक नेमण्यास शासनाने संमती दिलेली असल्याने लवकरच हे पद भरले जाईल.’’