कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने आणि प्रतिकात्मक पुतळा दहन

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर देशद्रोही कलमांतर्गत कारवाई करण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करणारे हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, २७ सप्टेंबर (वार्ता.) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि आतंकवादविरोधी पथक यांनी देशभरात पी.एफ्.आय. (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेवर संयुक्त कारवाई करत १०६ जणांना अटक केली. कोल्हापुरात पी.एफ्.आय.च्या सदस्याला अटक करतांना गर्दी करून पोलिसांना घेरण्याचा प्रयत्न केला गेला. तरी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर देशद्रोही कलमांतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निदर्शने करून पी.एफ्.आय.चा पुतळा जाळण्यात आला. याचसमवेत पाकिस्तानचाही झेंडा जाळण्यात आला. आंदोलनानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी ‘सेवाव्रत प्रतिष्ठान’चे श्री. संभाजी साळुंखे, ‘नेशन फर्स्ट’चे श्री. अवधूत भाट्ये, भाजपचे श्री. महेश जाधव, श्री. अशोक देसाई, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे आणि श्री. शिवानंद स्वामी, सर्वश्री सुनील पाटील, नितीश कुलकर्णी, ज्ञानेश्वर अस्वले, प्रदीप उलपे, अनिल कोडोलीकर, सौरभ निगडे यांसह अन्य उपस्थित होते.

कोल्हापूर शहरात असणार्‍या मशिदी आणि मदसरे येथे बाहेरून येणार्‍या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तरी ते किती संख्येने आणि कुठून येतात, किती दिवस रहातात, पुन्हा कुठे जातात याची सर्व माहिती पोलिसांनी गोळा करून त्याचे अन्वेषण करावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

आंदोलन चालू असतांना हिंदुत्वनिष्ठांनी पाकिस्तानचा ध्वज रस्त्यावर अंथरला होता. यावरून नागरिकांच्या दुचाकी-चारचाकी गाड्या जात होत्या. याच कालावधीत त्या मार्गावरून जाणार्‍या वाहतूक पोलिसांची गाडी तेथून जात असतांना त्यांनी गाडी पाकिस्तानच्या ध्वजावरून घातली नाही, तसेच रस्त्यावरील ध्वज उचलून घेतला. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी वाहतूक पोलिसांना धारेवर धरले आणि तो ध्वज परत खाली रस्त्यावर अंथरण्यास भाग पाडले.