राष्ट्र आणि धर्म यांची उपासना करण्याचे सामर्थ्य श्री दुर्गामातेजवळ मागूया ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीस उत्साहात प्रारंभ !

श्री दुर्गामाता मंदिरासमोर धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी

सांगली, २६ सप्टेंबर (वार्ता.) – जिजाऊमाता यांनी नवरात्रीत स्वत:साठी काही न मागता आसेतु हिमाचल भगव्या झेंड्याचे राज्य उत्पन्न करणार्‍या पुत्राची मागणी केली. तोच आदर्श आपण समोर ठेवून स्वातंत्र्याची, राष्ट्र आणि धर्म यांची उपासना करण्याचे सामर्थ्य श्री दुर्गामातेजवळ मागूया, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते श्री दुर्गामाता दौडीच्या पहिल्या दिवशी माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्री दुर्गामाता मंदिरासमोर बोलत होते.

३५ वर्षेहून अधिककाळ ही दौड चालू आहे. प्रथम मारुति मंदिरासमोर असलेल्या शिवतीर्थावर सगळे धारकरी एकत्र आले. इथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले.

श्री दुर्गामाता दौडमध्ये मार्गक्रमण करतांना धारकरी

या प्रसंगी माजी महापौर श्री. सुरेश पाटील, दक्षिण भारत जैनसभेचे अध्यक्ष श्री. रावसाहेब पाटील, डॉ. समीर गुप्ते आणि सौ. गुप्ते, मराठा समाजाचे अध्यक्ष श्री. अभिजित पाटील, भारती हॉस्पिटल येथील डॉ. श्रीकांत देशपांडे आणि सौ. देशपांडे, ३० वर्षे श्रीरायगड पुजेस आणि सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीच्या पूजेसाठी हार देणारे श्री. सुभाष जाधव, तसेच धारकरी सर्वश्री हणमंतराव पवार, हरिदास कालिदास, मिलिंद तानवडे, राहुल आनंदे, जगदिश जुमनाळ, राहुल बोळाज, अंकुश जाधव, सचिन पवार यांसह मोठ्या संख्येने अन्य धारकरी उपस्थित होते.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

ध्वजपूजेनंतर सर्व धारकरी दौड करत माधवनगर रस्त्यावरील श्री दुर्गादेवीच्या मंदिराकडे गेले. येथे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे मार्गदर्शन झाले. यानंतर शहरातील विविध मार्गांवरून जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपाशी दौडीचा समारोप झाला.


श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या ‘श्री दुर्गामाता दौडीस’ कराड तालुक्यात उत्साहात प्रारंभ !

कराड शहरात ‘श्री दुर्गामाता दौडी’त सहभागी धारकरी

कराड, २६ सप्टेंबर (वार्ता.) – कराड शहर आणि तालुक्यात १०० हून अधिक गावांत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त ‘श्री दुर्गामाता दौडी’स उत्साहाने प्रारंभ झाला. भारत मातेचा उद्ध्वस्त होत चाललेला संसार दुरुस्त करण्यासाठी, शिवतेज आणि शंभूतेज आपल्या मध्ये निर्माण व्हावे यांसाठी युवक-युवती यांनी ‘श्री दुर्गामाता दौडी’त सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.