२६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत मंदिरात विविध धार्मिक विधी आणि सेवा कार्यक्रम
धाराशिव, २५ सप्टेंबर (वार्ता.) – तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव १७ सप्टेंबर या दिवशी देवीच्या मंचकी निद्रेपासून चालू झाला आहे. २६ सप्टेंबर या दिवशी पहाटे आणि सकाळी श्री तुळजाभवानीदेवीची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, तसेच दुपारी १२ वाजता घटस्थापना होणार आहे. सायंकाळी अभिषेक आणि आरती नंतर रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. या महोत्सवात २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक विधी आणि सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री तुळजाभवानी मंदिर विद्युत् रोषणाईने उजळून निघाले आहे.
भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय !
श्री तुळजाभवानीदेवीच्या ‘ऑनलाईन’ दर्शनासाठी www.shrituljabhavani.in या संकेतस्थळावरून दर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाधिक भाविकांनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.