‘पी.एफ्.आय.’चा सरचिटणीस अनिश अहमद याला शिरसी (कर्नाटक) येथे घेतले कह्यात !

‘पी.एफ्.आय.’चा सरचिटणीस आणि सक्रीय कार्यकर्ता अनिश अहमद

वास्को, २३ सप्टेंबर (वार्ता.) – गेल्या १० वर्षांपासून गोव्यात ‘पी.एफ्.आय.’चा प्रसार करणारा ‘पी.एफ्.आय.’चा सरचिटणीस आणि सक्रीय कार्यकर्ता अनिश अहमद याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने शिरसी (कर्नाटक) येथून कह्यात घेतले आहे. अनिस अहमद याने गोव्यासमवेतच दक्षिण भारतात ‘पी.एफ्.आय.’ची पाळेमुळे घट्ट रूजवण्याचा प्रयत्न करत होता. ‘एन्.आय.ए.’ने २१ सप्टेंबर या दिवशी अनिश अहमद याच्या बायणा, वास्को येथील घरावर धाड टाकली होती; मात्र ‘एन्.आय.ए.’च्या धाडीविषयी पूर्वकल्पना मिळाल्याने अनिश अहमद  कुटुबियांसह तेथून पसार झाला होता. अनिश अहमद याला पुढे शिरसी (कर्नाटक) येथे कह्यात घेऊन त्याला देहली येथे नेण्यात आले आहे. देहली येथे न्यायालयाने त्याला ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

अनिस अहमद हा ‘पी.एफ्.आय.’चा सक्रीय कार्यकर्ता होता, अशी कल्पनाही केली नव्हती ! – रामचंद्र कामत, स्थानिक नगरसेवक

बायणा, वास्को येथील हाऊसिंग बोर्ड येथे वास्तव्य करणारा अनिश अहमद याचे  ‘पी.एफ्.आय.’शी संबंध असल्याची माहिती उघड झाल्यानंतर स्थानिक लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. (असे धक्के यापुढे बसू नयेत, यासाठी आपल्या परिसरात रहायला येणार्‍यांची कसून चौकशी करण्यासमवेतच त्यांच्यावर लक्ष ठेवा  आणि संशयास्पद आढळल्यास पोलिसांना कळवा ! – संपादक) अनिश अहमद हा ‘पी.एफ्.आय.’चा सरचिटणीस आणि सक्रीय कार्यकर्ता होता. मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक तथा अनिश अहमद याचे शेजारी रामचंद्र कामत म्हणाले, ‘‘अनिश अहमद याचे कुटुंब चांगले आहे आणि ते अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे; मात्र आता कारवाईमुळे त्यांचे ‘पी.एफ्.आय.’शी संबंध असल्याचे उघड झाले आहे. अनिश अहमद याचा ‘पी.एफ्.आय.’शी संबंध कसा आला ? हे समजत नाही. अनिश अहमद याच्या सदनिकेत एक मौलाना (इस्लामचा अभ्यासक) रहातो आणि शेजारची मुले त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण घेण्यासाठी येतात.’’ (हा मौलाना त्या मुलांना काय शिकवतो हे पाहिले पाहिजे. त्यांच्यात कट्टरता निर्माण करतो का ? त्यांना जिहादचे शिक्षण देतो का ? हे शोधले पाहिजे ! – संपादक)


(म्हणे) ‘पी.एफ्.आय.’चा आवाज दाबण्यासाठी केंद्र सरकारची कारवाई !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने मडगाव येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या कारवाईचा केला निषेध

मडगाव, २३ सप्टेंबर (वार्ता.) – देशातील आतंकवादी कारवायांचे समर्थन करणे, आतंकवाद्यांना प्रशिक्षण देणे, आतंकवाद्यांना आर्थिक साहाय्य पुरवणे, आतंकवाद्यांची भरती करणे आदी आरोपांवरून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी २१ सप्टेंबर या दिवशी रात्री उशिरा गोव्यासह १५ राज्यांत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (‘पी.एफ्.आय.’च्या) ठिकाणांवर धाडी टाकून १०६ जणांना कह्यात घेतले. या पार्श्वभूमीवर ‘पी.एफ्.आय.’चे राष्ट्रीय कार्यकारी मंडळ आणि गोवा राज्य कार्यकारी मंडळ यांनी २३ सप्टेंबर या दिवशी मडगाव येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणांच्या या कारवाईचा निषेध केला. पत्रकार परिषदेला ‘पी.एफ्.आय.’चे स्थानिक अध्यक्ष शेख अब्दुल रौफ आणि महासचिव इम्रान महंमद यांची उपस्थिती होती. ‘पी.एफ्.आय.’च्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत पुढील सूत्रे मांडली.

१. केंद्रातील विद्यमान सरकार विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा वापर करत आहे. (प्रत्येक जण कारवाई झाली की, असेच आरोप करतो; पण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची काळी कृत्ये आणि त्यांचा आतंकवाद्यांशी संबंध वारंवार उघड झाला आहे. त्यामुळे ही कारवाई विरोधकांना संपवण्यासाठी नाही, तर देशात फोफावत असलेला आतंकवाद संपवण्यासाठी आहे, असेत बहुतांश भारतियांना वाटते ! – संपादक) अशाच प्रकारे गोव्यातही भाजपने विरोधकांना संपवले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या समाजाचे विभाजन करणार्‍या मानसिकतेच्या विरोधात केवळ ‘पी.एफ्.आय.’ यशस्वीपणे आवाज उठवत आहे. (त्याचप्रमाणे आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याची हिंदुत्वनिष्ठ सातत्याने मागणी करत आहेत ! – संपादक)

२. ‘पी.एफ्.आय.’मुळे देशाला धोका आहे हा अन्वेषण यंत्रणांचा आरोप बिनबुडाचा आहे. (‘पी.एफ्.आय.’च्या केरळमधील नेत्याने वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे ध्येय ठेवण्याचे ध्येय ठेवण्यास कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्याविषयी रौफ आणि इम्रान महंमद यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक) ‘पी.एफ्.आय.’ ही मुसलमान, ख्रिस्ती, दलित या अल्पसंख्यांकांच्या हितासाठी कार्य करणारी संघटना आहे. (असे आहे तर केरळमध्ये समांतर फौज निर्माण कशासाठी केली ? – संपादक)

३. अन्वेषण यंत्रणांनी ‘पी.एफ्.आय.’ची अनेक खाती गोठवली आहेत; मात्र ‘असे का केले ?’, याविषयी यंत्रणांकडे स्पष्ट माहिती नाही.