हिजाब घालून मुलाखत घेण्याची इराणच्या राष्ट्रपतींची अट ‘सी.एन्.एन्.’च्या निवेदिकेने फेटाळली !

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

निवेदिका क्रिस्टिन एमनपोर आणि इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी

न्यूयॉर्क (अमेरिका) – इराणमध्ये सध्या हिजाबच्या विरोधात जोरदार आंदोलन चालू आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी हे सध्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित रहाण्यासाठी न्यूयॉर्क येथे आले आहेत. याच वेळी ‘सी.एन्.एन्.’ या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीकडून त्यांची मुलाखत घेण्यात येणार होती. या वृत्तवाहिनीच्या निवेदिका क्रिस्टिन एमनपोर या मुलाखत घेणार होत्या; मात्र राष्ट्रपती रईसी यांनी ‘मुलाखत घेणार्‍या महिलेने हिजाब घालावा’, अशी अट घातली. तथापि क्रिस्टिन यांनी ‘अमेरिकेत असा कोणताही नियम नाही’, असे सांगत रईसी यांची अट धुडकावून लावली. त्यामुळे ही मुलाखत होऊ शकली नाही. विशेष म्हणजे क्रिस्टिन एमनपोर या इराणी महिला आहेत. त्या इराणची राजधानी तेहरानमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या.

रईसी यांच्या हिजाब परिधान करून मुलाखत घेण्याच्या मागणीवर क्रिस्टिन म्हणाल्या की, जेव्हा मी इराणमध्ये वार्तांकन करत होते, तेव्हा तेथील कायदा आणि रीतिरिवाज यांचे पालन करण्यासाठी हिजाब परिधान केला होता. मी आता अशा देशात आहे, जेथे मुलाखतीसाठी हिजाब घालण्याचे कोणतेही नियम नाहीत. वर्ष १९९५ पासून मी अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या; पण मला हिजाब घालण्यास कधीही सांगितले गेले नाही.

इराणमध्ये कायद्यानुसार हिजाब घालणे अनिवार्य !

इराणच्या कायद्यानुसार सर्व महिलांनी डोके झाकणे आणि सार्वजनिक ठिकाणी सैल कपडे घालणे बंधनकारक आहे. हा नियम इराणमध्ये वर्ष १९७९च्या इस्लामी क्रांतीनंतर लागू करण्यात आला, जो देशातील प्रत्येक महिलेसाठी अनिवार्य आहे. यात पर्यटक, राजकीय व्यक्ती आणि पत्रकार यांचाही समावेश आहे.

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनात आतापर्यंत ३१ ठार, तर १ सहस्र जणांना अटक !

इराणमध्ये १६ सप्टेंबरपासून हिजाबच्या विरोधात निदर्शने चालू आहेत. या निदर्शनात महिलांसमवेत पुरुषही सहभागी झाले होते. आता हे आंदोलन १५ शहरांमध्ये पसरले आहे. पोलीस आणि आंदोलक यांच्यात हिंसक चकमकही चालू आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. गेल्या ५ दिवसांत करण्यात आलेल्या गोळीबारात आतापर्यंत ३१ जण ठार झाले आहेत, तर शेकडो लोक घायाळ झाले आहेत. १ सहस्राहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. सरकारच्या विरोधात तरुणांनी ‘गरशाद’ नावाचे मोबाइल ‘ॲप’ बनवले आहे. ५ दिवसांत १० लाख लोकांनी हे ॲप डाउनलोड केले आहे. याद्वारे तरुणांना गुप्त संदेश पाठवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर तेहरानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून इन्स्टाग्राम हे सामाजिक संकेतस्थळही ‘ब्लॉक’ करण्यात आले आहे.

संपादकीय भुमिका

उठसूठ भारतातील हिंदूंना ‘कट्टर’ ठरवणार्‍या अमेरिकेला आता ‘खरी कट्टरता काय असते ?’, ते कळले असेल ! आता अमेरिका इराणच्या राष्ट्रपतींना ‘कट्टर’ म्हणण्याचे धाडस दाखवणार का ?